पुणे Student Beaten In Pune University : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जगभरातील अनेक जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्याला विद्यापीठात कशासाठी आला, असं म्हणत जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विद्यापीठात मुलाला झालेल्या मारहाणीवरुन मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यानं चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन चार विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठात का आला म्हणून मारहाण : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माराहण झालेला विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं स्कील डेव्हलपमेंट डिपार्टमेटमध्ये शिक्षण घेत आहे. तसेच विद्यापीठात खोली क्रमांक 10, बॉईज होस्टेल इथं सुमारे नऊ माहिन्यापासून राहायला आहे. 7 तारखेला दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्याच्या मित्र आणि मैत्रिणींसह मेसमधून जेवण करुन जात होता. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन याठिकाणी तीन दुचाकीवरुन सहा मुलं आली. त्यामधील यूनिकॉर्न दुचाकीवरील दोन मुलांनी आणि त्याच्या इतर तीन ते चार अनोळखी सहकाऱ्यांनी त्याचं आधारकार्ड मागितलं. यावरुन त्याच्याशी वाद घातला.
धार्मिक वाद घालून शिवीगाळ : दुचाकीवर आलेल्या मुलांनी पीडित विद्यार्थ्याला आधार कार्ड मागितल्यानं वाद सुरू झाला. त्यानंतर त्या विद्यार्थ्यानं आधार कार्ड दाखवलं असता, त्याला धार्मिकबाबतीत शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्या विद्यार्थ्यानं केला आहे. त्याच्या मैत्रिणींना घटनास्थळावरुन जाण्यास बजावलं. त्याच्या मित्रालाही गालात चापट मारल्याचा दावा विद्यार्थ्यानं केला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : धार्मिक शिवीगाळ करुन विद्यार्थ्याला मारहाण केल्यानं पीडित विद्यार्थी घाबरला. त्याला दुचाकीवरुन आलेल्या मुलांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यानं केला. यावेळी मारण्याची धमकी त्याला दिल्याचा आरोप त्या विद्यार्थ्यानं केला. घटनेनंतर पीडित विद्यार्थ्यानं चतुश्रृंगी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आमच्याकडं विद्यार्थ्याला विद्यापीठात मारहाण करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
हेही वाचा :