मुंबई Ganesh Visarjan 2024 : मुंबईत मंगळवारी भाविकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत विसर्जन केलं आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळली. मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाचं शेवटचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी गिरगाव चौपाटी इथं मोठ्या प्रमाणात दाखल झाले. अशातच मुंबईचा प्रतिष्ठित बाप्पा पैकी लालबाग गणेश गल्ली येथील मुंबईचा राजा हा देखील गिरगाव चौपाटी इथं दाखल झाला. त्यानंतर भाविकांनी मोठ्या भक्तीभावानं मुंबईचा राजाचं विसर्जन केलं. आतापर्यंत मुंबईतील प्रतिष्ठित अशा मानाच्या गणपतींपैकी मुंबईचा राजा, तेजूकाया गणेश, कामाठीपुरा गल्लीतील गणपती, अंजिरवाडी, खेतवाडी येथील गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यासोबतच आतापर्यंत 19,176 गणपती विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.
गिरगाव चौपाटीवर भाविकांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप : मुंबईत लालबाग इथल्या गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी हे तीन प्रसिद्ध गणपती आहेत. मागील दहा दिवसात ज्या भाविकांना मुंबईच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही, अशा सर्व मुंबईकरांची आज गिरगाव चौपाटी इथं गर्दी जमलेली पाहायला मिळाली. मुंबईचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून गणपती बाप्पाभोवती एक मोठा घेरा केला. या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांचा उत्साह पाहायला मिळाला.
आतापर्यंत 19 हजार 176 गणपती बाप्पाचं विसर्जन : पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत एकूण 19 हजार 996 गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यातील 1053 सार्वजनिक मंडळाचे गणपती आहेत. तर, 17,996 हे घरगुती गणपती आहेत. यात 127 गौरींचं देखील विसर्जन करण्यात आल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जन पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. ठिकठिकाणी ढोल वाजवले जात असून गुलालाची उधळण केली जात आहे.
हेही वाचा :
- लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी मुंबईकरांची तुफान गर्दी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिला गणरायाला निरोप - Ganesh Visarjan 2024
- उपराजधानीत गणेश विसर्जनाची धूम, 'नागपूरच्या राजा'ला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी - Nagpur Ganesh Visarjan
- जर्मनीत गणेशोत्सवाचा जल्लोष: सातारा, पुण्यातील ढोलताशा अन् महिलांची लेझीम जुगलबंदी ठरली लक्षवेधी, पाहा व्हिडिओ - Germany Ganeshotsav 2024