अमरावती Ganeshotsav 2024 : विविध आकार आणि अनोखे स्वरूप असणारे एकूण 451 गणपती मूर्तींची स्थापना अमरावती शहरातील श्रीकृष्ण पेठ येथे खंडेलवाल कुटुंबाच्या (Khandelwal Family) घरात करण्यात आली आहे. घराचं अंगण, प्रवेशद्वार आणि पहिल्या मजल्यावर असणाऱ्या बैठकीपर्यंत विविध गणरायाचं दर्शन खंडेलवाल यांच्याकडं येणाऱ्या प्रत्येकाला आगळावेगळा आनंद देणारं आहे. ग्रामीण शैलीसह शहरी भागातील गणेशोत्सव, पूर्वीच्या काळातील गणेशोत्सवाची परंपरा आणि आज आधुनिक काळातील गणेश उत्सव असे विविध देखावे या ठिकाणी पाहायला मिळतात.
दर्शनाकरता घराची दारं ठेवली खुली : आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न खंडेलवाल कुटुंबीयांच्या वतीनं खास गणेशोत्सवानिमित्त करण्यात आला. विशेष म्हणजे हा सार्वजनिक उपक्रम नसला तरी, अमरावतीकरांना हे देखावे पाहण्यासाठी खंडेलवाल कुटुंबाने आपल्या घराची दारं सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुली ठेवली आहेत.
ऑलिंपिकपटूंना मानवंदना : खंडेलवाल यांच्या घराच्या अंगणात सर्वात आधी गणरायाचं दर्शन घडतं. त्या ठिकाणी जर्मन ऑलिंपिकमध्ये भारताचं नाव उंचविणाऱ्या ऑलिंपिकपटूंना मानवंदना देणारा देखावा हा आपल्या खेळाडूं प्रति आदर निर्माण करणारा आहे. या ठिकाणी ऑलिंपिक रिंग उभारून विविध खेळांचे मैदान साकारण्यात आले आहे. ऑलिंपिकमध्ये पदक विजेत्या स्पर्धकांची छायाचित्रे हे ऑलिंपिक संदर्भात भारताला मिळालेल्या यशाची माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे.
ग्रामीण आणि शहरी संस्कृतीची तुलना : खंडेलवाल यांच्या घराच्या अंगणात प्रवेश करतात सर्वात आधी ग्रामीण भागातील गणेशोत्सव आणि शहरी भागातील गणपती उत्सव यांची तुलना करणारे देखावे पाहायला मिळतात. हिरव्यागार शेतात छान आराम करणारी गणरायाची मूर्ती, गावातील मंदिर, गावात निसर्गाचं महत्त्व जपणारे गणरायाचे देखावे अशी कलाकृती पाहायला मिळते. बैलगाडी आणि ट्रॅक्टरने गणेश स्थापनेसाठी गावांमध्ये आणली जाणारी गणेश मूर्ती या ठिकाणी पाहताना वेगळाच भाव निर्माण होतो. दुसऱ्या बाजूला शहरात असणाऱ्या उंच इमारती, प्रदूषण अशा वातावरणात गणरायाची स्थापना असा सारा बोलका देखावा पाहणाऱ्याला अगदी निःशब्द करतो.
पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन : घरात प्रवेश करतात तळमजल्यावर पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घडवणारा देखावा खंडेलवाल कुटुंबीयांनी खास साकारला आहे. विठ्ठलाच्या मूर्ती समोर स्थापन केलेली गणरायाची मूर्ती अगदी डोळ्यात भरणारी आहे. या ठिकाणी काढलेली भव्य रांगोळी देखील नजर खिळवून ठेवणारी आहे. विठुराया समोरील वारकरी संप्रदाय हे सारं काही पंढरपूरच्या उत्सवात गणरायाचं दर्शन देणारे आहे. यासोबतच बाजूला वृंदावनातील कृष्ण लीला हा देखावा देखील मन मोहणारा आहे.
महिला अत्याचारा विरोधात संदेश : देशात गत काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असून त्या संदर्भात जागृती निर्माण करणारा संदेश घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे." महाभारत मे कृष्ण रामायण में राम भगवान नें भी उठाया हत्यार क्यू चुप हैं हम इन्सान" यासोबतच " बेटी पडी, बेटी बची नही, कहा है सरकार, कहा है इन्साफ क्या करेंगे हम भगवान के धरती पर आने का इंतजार" अशा स्वरूपाचे सामाजिक संदेश गणेशोत्सवाचा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.
मुख्य मूर्तीची हंसावर आरूढ : खंडेलवाल यांच्या घरात एकूण 451 विविध स्वरूपातील आणि आकारातील गणरायांची स्थापना खास गणेशोत्सवानिमित्त केली असतानाच मुख्य मूर्ती ही हंसावर अरुढ आहे. गणेशोत्सवासाठी संपूर्ण सजावट करताना घरातील टाकाऊ वस्तूंचा पुरेपूर वापर करण्यात आला. घरात असणाऱ्या काचेच्या ग्लासापासून टिनाचे डब्बे, प्लायचे तुकडे, भुसा यापासून काय नवीन घडू शकतं याचा विचार करून गणेश उत्सवानिमित्त आम्ही घरात अधिक पैसा न खर्च करता टाकाऊ वस्तू पासूनच सजावट केली असल्याची माहिती, भाग्यश्री अग्रवाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अकरा गणपती पासून झाली सुरुवात : 1990-91 मध्ये सुनिता अग्रवाल यांनी घरात विविध आकाराचे असणारे एकूण 11 गणपतीची स्थापना केली होती. त्यावेळी आमचं घर लहानसं होतं. असं असताना कमी साहित्यापासून गणेशोत्सवाचा देखावा साकारला. दरवर्षी गणेशोत्सवाची नवी थीम आम्ही ठेवायला लागलो. आमच्या घरातला हा खास गणेशोत्सव नातेवाईक आणि मित्रांना देखील आवडायला लागला. यानंतर आम्ही जेथे कुठे जायचं त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती दिसल्या की, त्या घेऊन यायचं. अमेरिकेत गेलो तिथून गणरायाची मूर्ती आणली. कर्नाटकमधून गणपतीची मूर्ती घेतली. यासह देशात ज्या ठिकाणी गेलो तिथून त्या भागातील गणरायाच्या मूर्ती आम्ही आणल्या.
कुटुंबातील सर्वांचे सहकार्य : काही नातेवाईक आणि मित्रांनी देखील आम्हाला विशेष अशा गणरायाच्या मूर्ती भेट स्वरूपात आणून दिल्या. आज इतक्या मोठ्या गणरायाच्या मूर्ती आम्ही गणेशोत्सव काळात घरात बसवतो. आमच्यासाठी गणेशोत्सवाचे हे दहा दिवस दिवाळी समानच आहेत असं सुनिता खंडेलवाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. अमेरिकेतून शिकून आलेला मुलगा, लंडनमधून शिकून आलेली मुलगी, सून, माझे पती हे सारेच गणेशोत्सव असा आगळावेगळा स्वरूपात साजरा करण्यासाठी सहकार्य करतात. चार वर्षे वयाच्या नातीनं शाळेत मातीचा गणपती तयार केला. तो गणपती देखील आम्ही या ठिकाणी स्थापन केला. घरातील प्रत्येकाच्या सहकार्यानेच हा सोहळा आयोजित करण्यात येतो. दहाही दिवस रोज सायंकाळी भजन होते. गणेशोत्सवाचे हे दाहही दिवस आमचं घर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत प्रत्येकासाठी खुलं असतं असं देखील सुनिता खंडेलवाल म्हणाल्या.
भग्नमूर्तींचीही जोपासना : गणरायाच्या एखाद्या मूर्तीचा हात किंवा काही तुटलं तर त्या घरात नसाव्या अशी अंधश्रद्धा आहे. घरातील एखाद्या सदस्याचा हात पाय मोडला तर आपण त्याला टाकून देत नाही अगदी त्याप्रमाणेच आम्ही घरातील गणरायाची एखादी मूर्ती असं काही झालं असेल तर टाकून न देता तिला व्यवस्थित जोडून पुन्हा घरातच ठेवतो. गणपतीची कृपा ही कायम असल्यामुळं आमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी असल्याचं देखील सुनिता खंडेलवाल यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- 'या' शुभ मुहूर्तावर गौराई येणार माहेरी; जाणून घ्या ज्येष्ठा, कनिष्ठा गौरीची कथा - Jyeshtha Gauri Avahana 2024
- गौराईंच्या खरेदीची लगबग; यंदा गौराईचा 'हा' आहे ट्रेंड, 'या' दिवशी होणार आगमन - Jyeshtha Gauri Avahana 2024
- 'असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा', मुंबईतील तरुणीच्या घरी चॉकलेटचे बाप्पा विराजमान, 'असं' केलं जाणार विसर्जन - Ganeshotsav 2024