छत्रपती संभाजीनगर Ganesh Festival 2024 : गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं आवश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून छत्रपती संभाजीनगर येथील दीपशिखा फाउंडेशनच्या मनीषा चौधरी यांनी आगळी वेगळी मोहीम राबवली आहे. शाडूच्या मातीपासून तयार झालेला बाप्पा विसर्जित झाल्यानंतर त्या मातीचा पुनर्वापर केला जात नाही, ती माती झाडांमध्ये, विहिरीत गेल्यास पर्यावरणाला घातक ठरू शकते. म्हणूनच 'बाप्पा माझा मातीचाच' ही मोहीम राबवण्यात येतेय. यापुढं साध्या मातीची मूर्ती घडवण्यासाठी चळवळ राबवणार असल्याचं मनीषा चौधरी यांनी सांगितलं.
मातीच्या बाप्पाची निर्मिती गरजेची : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या गणेशाची संकल्पना गेल्या काही वर्षांत पुढं आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जातेय. शाडू मातीच्या मूर्तीचं विसर्जन बकेट किंवा मोठ्या भांड्यात घरच्या घरी करता येते. त्यात साचलेली माती ठेवली तर पुढच्या वर्षी याच मातीपासून मूर्ती बनवता येते. मातीच्या पुनर्वापरामुळं पर्यावरणाची हानी होत नाही. मात्र, भाविक मूर्ती विसर्जनासाठी विहिरीवर किंवा तलावात घेऊन जातात. त्या ठिकाणी मूर्ती पाण्यात विरघळली की त्यातील बारीक माती पाण्याच्या झऱ्यांमध्ये जाऊन ते बंद होण्याची भीती असते. त्याचबरोबर घरी विसर्जन केलं, तरी त्याची माती झाडाच्या मुळाशी फेकली जाते, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. त्यामुळं मातीचा पुनर्वापर करायचा असेल, तरच शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करावा, अन्यथा साध्या मातीच्या मूर्तीचा वापर करा, असा सल्ला पर्यावरणप्रेमी व दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिला.
मातीच्या बाप्पासाठी विशेष कार्यशाळा : शाडू मातीच्या गणेशाची जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, मात्र आता साध्या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे दीपशिखा फाऊंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षांपासून मातीचे गणपती बनवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. साध्या मातीची मूर्ती कुठंही विसर्जित केली, तरी निसर्गाचं नुकसान होत नाही. यंदा मात्र "बाप्पा माझा मातीचाच" असं विशेष अभियान राबवण्यात आलं. त्यासाठी एकाच ठिकाणी दोन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. पहिल्यांदा माती कशी भिजवायची, मातीचा गोळा कसा बनवायचा हे शिकवलं. दुसऱ्यांदा प्रत्यक्ष मूर्ती कशी बनवायची याचं प्रशिक्षण देण्यात आलं. गेल्या काही दिवसात 22 कार्यशाळांमध्ये 1661 मुलांनी मातीच्या मूर्ती बनवल्या. पुढील वर्षी या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा मानस असल्याचं मत मनीषा चौधरी यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा