मुंबई Mumbai Chocolate Ganpati : गणपती मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ची असू नये ती मातीची असावी असा आग्रह आणि नियम असला तरी अद्यापही पीओपीच्या मूर्ती बहुसंख्य ठिकाणी बघायला मिळतात. सांताक्रुझ येथे राहणाऱ्या रिंतु राठोड नेहमी जुहू चौपाटीवर जात असत. मात्र, गणेश विसर्जनानंतर या ठिकाणी गणेश मूर्ती विद्रुप अवस्थेत असल्याचं पाहणे त्यांच्या अनेकदा नशीबी येत असे. त्यामुळं त्यांनी हा प्रकार थांबण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरु केला.
चॉकलेट गणेश नेमका कसा? : पूर्ण चॉकलेटपासून या गणेश मूर्ती तयार केल्या जातात. भक्तांच्या सांगण्याप्रमाणे त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातात. धार्मिक शास्त्राचे पूर्ण पालन करुन या मूर्तीचं पूजन केलं जातं. गणेशोत्सवात मातीच्या किंवा पीओपीच्या मूर्तीप्रमाणे या मूर्तीला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. विसर्जनावेळी देखील धार्मिक प्रथा परंपरांचं आणि शास्त्राचं पूर्ण पालन करुन नियमित मूर्तीप्रमाणे या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. केवळ फरक इतकाच आहे की, इतर मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोत असलेल्या पाण्यामध्ये किंवा कृत्रिम तलावात केलं जातं. तर या मूर्तींचं विसर्जन पाण्याऐवजी दुधामध्ये केलं जातं. त्यानंतर ते चॉकलेटचे दूध कुठेही न वाया घालवता अनाथाश्रमातील मुलांना, गरीब मुलांना दिलं जातं.
घरचा गणपती 25 इंचांचा : रिंतु यांच्या घरात यंदा विराजमान झालेला गणपती 25 इंचांचा आहे. तर त्यांनी बनवलेला चॉकलेटचा गणपती सर्वात छोटा म्हणजे 3 इंचांचा तर सर्वात मोठा म्हणजे 3 फुटांचा आहे. रिंतु राठोड या स्वतः या सर्व मूर्ती बनवण्याचं काम करतात. पीओपी गणेश मूर्तीमुळं प्रदूषण होतं. मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर त्या पाण्यात लवकर विरघळत नाही. त्यामुळं अनेकदा किनाऱ्यावर त्याचे अवशेष पडलेले दिसतात. मात्र, चॉकलेटच्या गणपतीमुळं या समस्या उद्भवत नाहीत. रिंतु या विविध व्यक्तिमत्वांच्या चॉकलेटचे प्रतिरुप (रेप्लिका) बनवतात. चॉकलेटद्वारे बनवलेली ही प्रतिरुपं सुमारे महिनाभर टिकतात. चॉकलेट गणपतीच्या विसर्जनानंतर हे दूध मुलांच्या पोटात जातं. त्यामुळं त्या माध्यमातून मुलांमध्ये गणेशाची दिव्यता कायम राहते, अशी भावना रिंतु राठोड यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- गणेशोत्सव 2024; पारंपरिक पद्धतीनं 'छत्रपती' घराण्याच्या 'शाही गणपतीचं' आगमन, खासदार शाहू महाराजांनी केली पूजा - Ganeshotsav 2024
- गणेशोत्सव 2024; नवसाला पावणारा नागपूरचा "टेकडी गणपती", 350 वर्षांचा आहे इतिहास - Ganeshotsav 2024
- ढोल ताशांच्या गजरात पुण्यात मानाचे पाच गणपती बाप्पा झाले विराजमान; पाहा आगमन मिरवणूक व्हिडिओ - Ganeshotsav 2024