ठाणे Ganeshotsav 2024 : ठाण्यातील मूर्तिकार अगदी अमेरिका, जपानमध्येही आपल्या गणेशमूर्ती पोहोचवत आहेत. या गणेशमूर्ती पोहोचवण्यासाठी लागणारा कालावधी मोठा असल्यानं त्यांनी या गणेशमूर्तींची समुद्रमार्गे जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील भाविकांना पाठवण्यास सुरुवात केली आहे.
मूर्ती पाठवताना घ्यावी लागते खबरदारी : गणपती बप्पांच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. त्यामुळं ठाण्यातील अनेक विक्रेते हातानं बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिका, जपान, कॅनडाला पाठवत आहेत. या मूर्ती नाजूक असल्यानं विक्रेत्यांना पाठवण्यासाठी एक विशिष्ट शिपिंग पद्धत वापरल्याचं विक्रेत्यानं म्हटलं आहे. या मूर्ती पाठवताना विशेष खबरदारी घेतली जाते.
विदेशात जाणाऱ्या मूर्ती इको फ्रेंडली : यावर्षी अमेरिकेला 3 हजार मूर्ती पाठवण्यात आल्या असून कॅनडाला 2 हजार मूर्तींची निर्यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर जपानमध्ये 500 मूर्ती पाठवण्यात येणार आहेत. यंदा अमेरिकेला कागदी लगद्यापासून बनवलेली 5 फुटाची मूर्ती पाठवली असून या मूर्तीचं रूप लालबागच्या राजासारखं आहे. तर चार ते साडेचार फुटाच्या 25 मूर्ती अमेरिकेला पाठवल्या आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा गणेश मूर्तीची मागणी वाढली असून एक्सपोर्टला जाणाऱ्या मूर्ती इको फ्रेंडली असल्याचं मूर्तिकारानं म्हटलं आहे.
अमेरिकेत पोहचण्यासाठी लागतात तीन महिने : विदेशात पाठवण्यात येणाऱ्या सर्व मूर्ती समुद्रामार्गे बोटीने पाठवल्या जातात. या मूर्ती शाडू आणि कागदापासून बनवलेल्या असल्याने नाजूक असतात. त्यामुळं एक्सपोर्ट करताना बबल रॅपिंग बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करावी लागते. या मूर्ती अमेरिकेत पोहचण्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. अमेरिकेत मूर्ती हव्या असल्यास त्याची बुकिंग आम्ही जानेवारी, फेब्रुवारीपासून करतो, अशी माहिती मूर्तिकारानं दिली आहे.
'हे' वाचलंत का :