गडचिरोली Major Maoists Encounters : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई बुधवारी ( 17 जुलैला) करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. विशेष म्हणजे या चकमकीत 25 लाखांहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी डीव्हीसीएम लक्ष्मण मारला गेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना ही कारवाई झाली. यात नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रं जप्त करण्यात आली. मात्र, पोलिसांनी केलेली कारवाई ही पहिली नाही. याआधी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना आणि सुरक्षा दलाला यश आलं आहे.
नेमकं काय घडलं: गडचिरोली जिल्ह्यातील झारवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत छिंदभट्टी आणि पीव्ही 82 ( जिल्हा कांकेर पोलीस स्टेशन हद्दीतील ) जंगलात सी-60 जवान, महाराष्ट्र पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. नक्षलवाद्यांकडून तीन एके 47 राफल्स, दोन इन्सास, एक कार्बाइन, एक एसएसआरसह 7 स्वयंचलित शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. चकमकीत सी 60 दलाचे दोन जवान जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडविसांनी याऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सी 60 जवानांना 51 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
आजपर्यंत गडचिरोलीत अशा झाल्या कारवाया
- 19 फेब्रुवारी 2024- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलीस कमांडो आणि CRPF यांच्याशी झालेल्या चकमकीत एकत्रितपणे 36 लाखांचं रोख बक्षीस असलेले चार नक्षल कमांडर मारले गेले.
- 13 मार्च 2021- गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 युनिटसोबत झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
- 21 मे 21- मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तहसीलमधील कोटमी जंगलात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान पोलिसांनी सात महिलांसह 13 नक्षलवाद्यादी यमसदनी पाठवण्यात यश आलं.
- 28 एप्रिल 2021- एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया जंगलात गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.
- 28 मार्च 2021- रोजी गडचिरोली पोलिसांनी एका कारवाईत एका उच्चपदस्थ कार्यकर्त्यासह पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला. उत्तर गडचिरोलीतील कुरखेडा तहसीलच्या खोब्रामेंढा भागात ही चकमक घडली. या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या ऑपरेशनचं नेतृत्व महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी ऑपरेशन्स (ano) च्या C-60 कमांडो पथकानं केलं होतं.
- 18 सप्टेंबर 2020- नक्षलविरोधी पथक (ANS) कमांडो पथकानं धानोरा तालुका (महसूल उपविभाग) अंतर्गत कोसमी-किसनेली जंगलात तीन महिला कॅडरसह भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI-Maoist) च्या पाच कार्यकर्त्यांना ठार केलं.
- 2 मे 2020- जारावंडी गावाजवळील पेंध्रा विभागातील सिनभट्टीच्या जंगलात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांसोबत (SFs) झालेल्या चकमकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष-माओवादीची (CPI-Maoist) वरिष्ठ महिला 'कमांडर' ठार झाली.
- 15 सप्टेंबर 2019 - महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील नरकसा जंगल परिसरात सुरक्षा दलांसोबत (SFs) झालेल्या चकमकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी-माओवादी (CPI-Maoist) चे किमान दोन कार्यकर्ते ठार झाले. पाच जण जखमी झाले.
- 27 एप्रिल 2019 - दोन महिला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी) कॅडरच्या डोक्यावर तब्बल 1.6 दशलक्ष बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ कॅडरला गोळ्या घालण्यात आल्या. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील कोटी गावाजवळ सुरक्षा दलांशी (SFs) नक्षलवाद्यांची चकमक उडाली. यावेळी ही कारवाई करण्यात आली.
- 28 फेब्रुवारी 2019 - गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत पाच महिलांसह भारतीय कम्युनिस्ट पार्टी-माओवादीचे (CPI-Maoist) किमान आठ कार्यकर्ते मारले गेले.
- 22 एप्रिल 2018 - महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 37 कट्टर नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 कमांडोमधील समन्वयामुळे ही कारवाई केली. यात नक्षलवाद्यांवर 1.06 कोटी रुपयांचं एकत्रित बक्षीस होतं.
- 6 डिसेंबर 2017 - महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच महिलांसह सात नक्षलवादी ठार झाले. सिरोंचा तालुक्यातील झिंगनूर चौकीच्या उत्तरेला सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्लेड गावातील जंगलात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. गडचिरोली C-60 कमांडोचं एक पथक नक्षलविरोधी ऑपरेशनवर होतं. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
- 18 फेब्रुवारी 2014 - गडचिरोली जिल्ह्यातील अलीटोला गावाजवळ महाराष्ट्र पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात सीपीआय-नक्षलवादी कॅडर मारले गेले.
हेही वाचा