चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा ऐतिहासिक वास्तूंसाठी ओळखला जातो. इथं अनेक ठिकाणी प्राचीन साहित्य आढळून येतं. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात सातवाहन वसाहतीचे अवशेष मिळाले आहेत. यामध्ये खेळणी, दिवे, मातीचे भांडे, वरवंटा आदी वस्तूंचा समावेश आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सातवाहन काळाचा इतिहास दडलेला आहे. अनेकदा उत्खननात याचे अवशेष आढळून आलेले आहेत. मात्र यावर अद्यापही सखोल असं संशोधन झालेलं नाही. हे संशोधन झाल्यास यात दडलेला मोठा इतिहास समोर येण्याची शक्यता इतिहास तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सातवाहन कालीन वस्तीचे अवशेष : जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील टेकाभट्टी या प्राचीन रिठावर सातवाहन कालीन वस्तीचे अवशेष आढळून आले आहेत. हे ठिकाण चिवंडा गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वी याच परिसरात टेराकोटाच्या विविध वस्तूचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. यामध्ये खेळणी, दिवे, मातीचे भांडे, वरवंटा, रांजण या वस्तूचा समावेश. इथं बहामनी सलतनतची तांब्याची नाणी सुद्धा अनेकदा सापडली आहेत. या संपूर्ण परिसरात आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक वास्तू सापडल्या आहेत. मात्र दुर्दैवानं यावर फारसं संशोधन झालं नाही. त्यामुळे येथील भूगर्भातील इतिहास अजूनही उलगडलेला नाही. याच परिसरात आधी चिवंडा गावात विरगड शिल्प आढळून आलं. याच भागात लहान मोठी अनेक रिठ आहेत. इथं अनेक देखणे शिल्प यापूर्वी सापडले आहेत. सध्या इथं पुन्हा सातवाहन कालीन वसाहतीचे अवशेष आढळल्यानं इथल्या संशोधनाच्या मागणीला जोर पकडला आहे.
संशोधनाकडं होतेय दुर्लक्ष : चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सातवाहन कालीन अनेक वसाहती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. यापूर्वी अनेक उत्खननात सामान्य लोकांना याचे अवशेष मिळाले आहेत. मात्र त्यावर दुर्दैवानं गांभिर्यपूर्वक संशोधन झालेलं नाही. यावर संशोधन झाल्यास दडलेला सातवाहन कालीन इतिहास समोर येण्यास मदत होणार आहे, असं मत इतिहास अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :