मुंबई Raghuram Rajan Met Uddhav Thackeray : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या भेटीचा फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भेटीवेळी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांची उपस्थित होती. रघुराम राजन यांनी अचानक उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.
भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट : रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतल्यानंतर विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. तसंच या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, भेट कोणत्या कारणासाठी घेतली असावी? यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे. उद्धव ठाकरे, रघुराम राजन यांचे संबंध पूर्वीपासून चांगले आहेत. त्यामुळं रघुराम राजन यांनी ही केवळ सदिच्छा भेट घेतली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अर्थव्यवस्थेत दिलेलं योगदान मोठं : रघुराम राजन यांच्या भेटीबाबत आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. रघुराम राजन यांचं मातोश्री निवासस्थानी आदरातिथ्य करता आल्यानं खूप आनंद झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. "RBI चे गव्हर्नर तसंच इतर विविध पदांवरून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत दिलेलं योगदान मोठं आहे. दूरदृष्टी असलेल्या अशा तज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा द्यावी", असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
केंद्राच्या धोरणावर राजन यांची टीका : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक होत भाजपाला निवडणुकीचं आव्हान दिलं होतं. त्यामुळं राष्ट्रीय स्तरावरही उद्धव ठाकरे यांची दखल घेतली जात आहे. शिवसेना पक्ष फुटीमागे मोदी-शाह कारणीभूत असल्याची टीका उद्धव ठाकरे सातत्यानं करत आहेत. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचं बोललं जात आहे. तसंच उद्धव ठाकरे नेहमीच केंद्राच्या कारभारावर निशाणा साधत असतात. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली होती. एका कार्यक्रमात रघुराम राजन यांनी केंद्राचं आर्थिक धोरण चुकीचं असून त्यामुळं बेरोजगारी, महागाई वाढल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधान आलं आहे.
हे वाचलंत का :