चंद्रपूर Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्हा आता गुन्हेगारी विश्वाचे केंद्र बनत चालला आहे, असे चित्र आहे. गेल्या काही महिन्यात सातत्यानं गोळीबाराच्या घटना होत असताना आज गुन्हेगारी विश्वात दबदबा असणाऱ्या हाजी सरवर शेख (वय ४८ ) याची चंद्रपुरात निघूर्ण हत्या करण्यात आली. त्यामुळे जिल्हा पुन्हा हादरला आहे.
नेमकं काय घडलं : मृतक हाजी शेख मित्रांसोबत शहरातील बिनबा गेट समोरील शाही दरबार हॉटेलमध्ये दुपारी जेवायला गेले होते. जेवण करत असताना चार ते पाच जणांच्या टोळीनं त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर धारदार शस्त्रानं हल्ला केला. आता टोळीयुद्ध भकडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हत्या जुन्या वैमनस्यातुन केल्याचं सांगितलं जात आहे. खून, खंडणी, शस्त्राची तस्करी आदी गुन्ह्यात हाजी सरवर शेखनं तुरूंगवास भोगला आहे. जवळपास सात वर्ष तो कारागृहात होता. दीड वर्षांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून तो गुन्हेगारी विश्वापासून दूर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.
हाजी चंद्रपूर तालुक्यातील नकोडा येथील रहिवासी आहे. या परिसरात कोळसा खाण आणि सिमेंट प्रकल्प आहे. या दोन्ही ठिकाणी त्याची दहशत होती. तो स्वतः कोळशाचा व्यवसाय करायचा. काही वर्ष तो नकोड्याचा उपसरपंच सुद्धा होता. दरम्यान आज दुपारी मुस्लिम बहुल भागातील बिनबा गेट समोरील शाही दरबार या हॅाटेलमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमाराला मित्रांसोबत जेवायला गेला. याच दरम्यान चार ते पाच जणांच्या टोळीनं हॅाटेलमध्ये प्रवेश केला आणि हाजी यांच्यावर बेछुट गोळीबार केला. त्यामुळं हॅाटेलमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांनी हॅाटेलमधून पळ काढला. हॅाटेलच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हाजीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. हल्ल्यात हाजीचा एक मित्र सुद्धा जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
जुन्या वैमनस्यातुन हे हत्याकांड : हाजीवरील हल्याची बातमी पोहचताच मोठ्या संख्येत त्याचे समर्थक रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाले. स्वतः जिल्हा पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका रुग्णालयात पोहचले. बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त फौजफाटा रुग्णालयाच्या परिसरात तैनात करण्यात आला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमाराला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हाजीला मृत घोषित केलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. या प्रकरणी पाच जण पोलिसांना शरण गेले. यातील मुख्य आरोपी हा समीर शेख असल्याची माहिती समोर येत आहे. समीर आणि हाजी हे आधी मित्र होते. मात्र, अवैध धंद्याच्या कारणावरून त्यांच्यात शत्रुत्व निर्माण झालं. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून हे हत्याकांड घडलं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे.
चंद्रपुरातील बंदूकशाही : मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना सातत्यानं घडत आहे. गुन्हेगारी विश्वातील टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. टोळीयुद्ध भकडले आहे. जुलै -२०२४ या महिन्यात बल्लारपुरातील एका कापड दुकानावर गोळीबार करण्यात आला. मारेकऱ्यांनी दुकानावर पेट्रोल बॅाम्ब सुद्धा फेकलं. यात एक जण जखमी झाला. त्यांच्या दोन दिवसांपूर्वी चंद्रपुर शहरातील मध्यवर्ती भागातील रघुवंशी व्यापारी संकुलात मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार झाला. यात अंधेवार गंभीररित्या जखमी झाला. २३ जुलै रोजी राजुरा येथे रात्री सात वाजताच्या सुमाराला वर्दळीच्या रस्त्यावर शिवज्योतसिंह देवल याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला.
कायदा आणि सुव्यवस्था सपशेल कोलमडली : २०२३ मध्ये राजुरा येथे एका कोळसा व्यापाऱ्यावर गोळीबार झाला. यात त्याची पत्नी मारल्या गेली. ऑगष्ट महिन्यात युवा सेनेचा (उबाठा)शहर प्रमुख विक्रम सहारे यांच्याकडून पोलिसांनी तब्बल चाळीस जिवंत काडतुसासह तलवार जप्त केली. याच महिन्यात राजुरा तालुक्यातील लखमापूर येथे दिपक उमरे आणि विक्रम जुनघरे या दोघांकडून शस्त्र जप्त केले. गतवर्षी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर सुद्धा गोळी झाडण्यात आली. सुदैवाने बचावले. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि बिहार या राज्यातून शस्त्राचा पुरवठा होत आहे. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातून २२ जणांना हद्दपार केले. वाळू, कोळसा, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करीतुन टोळीयुद्ध भकडल्याचं सांगितलं जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था सपशेल कोलमडली आहे. पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर धाक राहीला नाही, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा