मुंबई Mumbai Hospital Fire : मुंबईतील विक्रोळी पूर्व भागातील टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात रविवारी (21 जानेवारी) भीषण आग लागली. आग लागल्यावर रुग्णांना त्वरीत सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही.
मध्यरात्री लागली भीषण आग : एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (21 जानेवारी) पहाटे 1.47 वाजेच्या दरम्यान त्यांना टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अखेर पहाटे 2.25 वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
- रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले : शिवाजी ढेले (65), विमल तिवारी (60), यशोदाबाई राठोड (58), कांताप्रसाद निर्मळ (75), अरुण हरिभगत (64), सुश्मिता घोक्षे (23) या सहा रुग्णांची रुग्णालयातून सुटका करून त्यांना मुंबईतील घाटकोपर भागातील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- आग तीन मजल्यांवर पसरली : अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग तळमजल्यापासून तीसऱ्या मजल्यावरील आयसीयूमधील एअर सेक्शन मोटरच्या मुख्य केबलपर्यंत पसरली होती. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, यासंदर्भात सध्या अधिकारी तपास करत आहेत.
22 मजली इमारतीला आग लागली : यापूर्वी शनिवारी (20 जानेवारी) दुपारी मुंबईतील मालाड परिसरात एका 22 मजली इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तसंच मिळालेल्या माहितीनुसार ही आग 18 व्या मजल्यापर्यंत पसरली होती. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा -
Mumbai Fire News : मुंबईतील न्यू पूनमबाग इमारतीला भीषण आग; आगीत होरपळून 96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू