बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डला आग लागून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरिभाऊ रोकडे (रा. पैठण) असं मृत पावलेल्या रुग्णाचं नाव आहे. रात्रीच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना जनरल वार्डमधून धूर निघत असल्याचं दिसून आल्यावर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वॉर्डमधील रुग्णाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
22 डिसेंबरला दुपारी मृत व्यक्ती हरिभाऊ रोकडे लोणार बसस्थानकावर अत्यावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं लोणार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यांनतर त्यांना बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, सदर व्यक्तीचे नातेवाईक नसल्यामुळं त्यांना एकटं पाठवणं जमत नसल्याची माहिती डॉ. फिरोज शहा यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हरिभाऊ रोकडे यांना लोणार ग्रामीण रुग्णालयातच ठेवण्यात आलं.
आगीत होरपळून मृत्यू : रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला 23 डिसेंबरच्या पहाटे हरिभाऊ रोकडे यांना ठेवण्यात आलेल्या वार्डातून धूर निघत असल्याचं दिसून आलं. सुरक्षा रक्षकानं इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, हरिभाऊ रोकडे यांच्या बेडला आग लागून ते जळत असल्याचं त्यांना दिसून आलं. या आगीत होरपळल्यामुळं रोकडे यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयाची पाहणी : घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे, तहसिलदार भूषण पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. पाहणी करून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. 23 डिसेंबर रोजी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून अंत्यविधी करण्यात आला. उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी तहसिलदार भूषण पाटील, पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे, नायब तहसिलदार रामप्रसाद डोळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले हे उपस्थित होते.
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट : "हरिभाऊ रोकडे रूग्णालयात बिडी ओढत असल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना बिडी ओढू नका, असं सांगितलं होतं," अशी माहिती डॉ. फिरोज शहा यांनी दिली. त्यामुळं सदर आगीची घटना रूग्णानं बिडी ओढल्या कारणानं घडली की शॉट सर्किटनं घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, नितिन खरडे करीत आहेत.
हेही वाचा
- महिलेची हत्या करुन नराधमानं मृतदेह फेकला झुडपात: पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांनी मारेकऱ्याला ठोकल्या बेड्या
- नवनियुक्त मंत्र्यांना बंगले वाटप, मंत्रालयातील दालनंही मिळाली; जाणून घ्या कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता बंगला ?
- "विमानतळाची नवीन धावपट्टी एक महिन्यांत पूर्ण करा, अन्यथा कारवाई...", नितीन गडकरींनी दिला अल्टिमेटम