अमरावती Heavy Rain in Amravati : जुलै महिना अर्धा निघून जात असताना पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात गत चार-पाच दिवसांपासून पाऊस बरसतो आहे. चांदूरबाजार तालुक्यात मात्र पावसाने अगदी कहर केला असून तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी या गावालगतच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी ढगफुटी सारखा पाऊस आला. या पावसामुळे अनेक शेतं ही जलमय झाली असून शेतातील पीकं ही पाण्याखाली आहेत. शेतात जिकडे-तिकडे पाणी झाल्यामुळे आणि अनेक भागात शेत खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे.
24 तासात 833 मिलिमीटर पाऊस : चांदूरबाजार तालुक्यातील धामणगाव खडी येथे शुक्रवारी चारच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर या भागात 24 तासात 833 मिलिमीटर पाऊस बरसल्याची नोंद झाली. अचानक ढगफुटी झाल्याप्रमाणे झालेल्या पावसामुळे शेतात काम करणारे शेतकरी शेतातच अडकले. अनेकांच्या शेतात अगदी गळ्यापर्यंत पाणी आल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावर यावं लागलं. रस्त्यावरून देखील पाणी वाहत होतं. विशेष म्हणजे, ब्राह्मणवाडा थडी हे 25 हजार लोकसंख्या असणारे गाव शुक्रवारी रात्री पाण्यात बुडाले होते.
शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी : शुक्रवारी दीड दोन तासाच्या पावसाने धामणगाव थडी परिसरात हाहाकार उडाला. धामणगाव थडी गावासह लगतच्या काही गावांमध्ये शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे अनेक शेतात आलेली पीकं ही अक्षरशः वाहून गेली. बरीच शेत पूर्णतः खरडून गेली. अनेकांच्या शेतात असणारे सोयाबीन कापूस, तूर ही महत्त्वाची पिकं वाहून गेलीत. यासह संत्रा बागा देखील मुसळधार पावसाने उध्वस्त झाल्या. या भागातील प्रसिद्ध असणारी वांगी खराब झाली. कोबी आणि टमाटरला देखील मोठा फटका बसला असल्याचं धामणगाव थळी येथील शेतकरी सचिन सोनार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
आसामला जाणारी वांगी आता पाण्यात जाण्याची भीती : धामणगाव थडी परिसरात अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या वांग्याचं उत्पादन शेतकरी घेतात. धामणगाव थडी येथील रहिवासी प्रणय आजनकर यांच्या दोन एकर शेतामधली वांगी सात लाख रुपयाला गतवर्षी आसामला गेलीत. यावर्षी मात्र प्रणय आजनकर यांच्या शेतातील वांगी पाण्यात बुडाली आहेत. सध्या ही वांगी सुस्थितीत असली तरी आणखी असाच पाऊस आला तर ही वांगी कायमची पाण्यात जाण्याची भीती वर्तवली जात आहे.
मोठं नुकसान, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष : शुक्रवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे धामणगाव थडी विश्रोळी तसेच माधानलगतच्या अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची शेतंही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. झाडावरचा संत्रा गळून पडला असताना देखील सोमवार पर्यंत प्रशासनाच्यावतीनं शेतकऱ्यांवर उलटलेल्या या संकटाची दखल घेतली गेली नसल्याची खंत गौरव बोडखे या तरुण शेतकऱ्यानं व्यक्त केली.
हेही वाचा :
- मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणे रद्द; एअर इंडियाच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार? - Air India news
- राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट - Maharashtra Weather Update
- गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला - Gadchiroli Rain