शिर्डी Farmers Agitation : दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी 28 जून पासून राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला होता. आजपासून या आंदोलनाला प्रत्यक्षात सुरवात झाली असून संगमनेर येथून आंदोलनाची सुरवात झालीय. संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी महामार्गावर मोठ्या संख्येनं दूध उत्पादक शेतकरी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केलं. शालेय विद्यार्थी देखील हातात फलक घेत दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक करावी अशी मागणी करत या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
काय म्हणाले अजित नवले : गेल्या वर्षभरापासून दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करुन दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत. दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारनं ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 40 रुपये दर द्यावा, बंद केलेलं दूध अनुदान पुन्हा सुरू करावं, वाढता उत्पादनखर्च आणि तोटा पाहता अनुदानात वाढ करुन ते प्रति लिटर 10 रुपये करावं तसंच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे.
कोणत्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक : दुधाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं, दूग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत, खासगी, सहकारी दूध संघाना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा, दूध भेसळ रोखावी, अनिष्ट ब्रँडवॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा, मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दूध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुकानिहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरु करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहे.
हेही वाचा :