संगमनेर(अहमदनगर) Pomegranate Farming : आजकाल शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र, संगमनेर तालुक्यातील डोळसणे येथील पोखरकर कुटुंबांनी खडकाळ जमीनीवर नंदनवन फुलवलं आहे. खडकाळ जमीनीवर त्यांनी डाळींब, आंबा, टोमॉटोसह इतर भाजीपाल्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. संयम, सातत्यपूर्ण नियोजन, मेहनत असेल तर यश नक्की मिळते, असं मत शेतकरी रत्नाकर पोखरकर यांनी व्यक्त केले.
शेतीत केले काबाडकष्ट : सध्या माझा भाऊ प्रकाश तसंच मी दोघंही उच्च शिक्षित असून आधुनिक शेती करतो. आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटण्या झाल्या. त्यात आमच्या वाट्याला माळरानावरील जमीन आली. येथूनच शेतीसह कुटुंबाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याची आमची धडपड सुरू झाली. माझे वडील मनसुबराव तसंच आमची आई नानीबाई यांनी शेतीत काबाडकष्ट केले. त्यावेळी वीज, पाण्याची सोय नव्हती. पावसाच्या पाण्यावरच पीक काढायचं असा आमचा प्रवासा सुरू होता. यातूनच कसेबसं आमचं शिक्षण पूर्ण झालं. अत्यंत वाईट परिस्थिती आम्ही जगलो. याचकाळात आईला आजारपणानं पछाडलं. कुटुंबावर अधिकच संकट ओढावलं, तेव्हा मोठ्या हिंमतीनं लढा दिला. आमच्या शेततील अधिक पाऊस झाल्यास नुकसान होत. तसंच कमी पाऊस झाला तरी नुकसान हे पाचवीलाच पूजलेलं होतं,असं शेतकरी रत्नाकर पोखरकर यांनी म्हटलं आहे.
![Cultivation of Tomatoes](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-07-2024/farmersuccessstory_12072024131548_1207f_1720770348_34.jpg)
शेती करण्याचा धाडसी निर्णय : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी पुणे गाठलं. तेथे दोन-चार वर्ष चांगल्या कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मुंबईला दोन-तीन वर्ष काम केलं. परंतु कुटुंबाला पुढं नेण्यासाठी उत्पन्न पुरेसं पडत नव्हतं. शेवटी अधुनिक शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. घरी आल्यावर शेती उभी करण्यासाठी पैसेही नव्हते. मग पीकं कशी घ्यायची असा मोठा प्रश्न निर्माण झाला.
![Pomegranate garden](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-07-2024/farmersuccessstory_12072024131548_1207f_1720770348_1090.jpg)
शेततळं निर्मितीचा ध्यास : त्यावेळी चांगली कल्पना सूचली. आम्ही शेततळं निर्मितीचा ध्यास घेतला. त्यासाठी अर्थसहाय्यही मिळत नव्हतं. कर्ज काढून शेतीची सुधारणा केली, त्यात महत्त्वाची म्हणजे पाईपलाईन केली. या जोरावर पंधराशे डाळिंबाची झाडं लावली. नंतर दुसर्या वर्षी कांदा पीकातून चांगलं उत्पन्न मिळालं. मग पुन्हा दुसरं शेततळं बनवलं. परत पंधराशे डाळिंबाच्या झाडांची लागवड केली. मात्र, शेततळं करताना रक्कम कमी पडली. जिवलग मित्र रखमाशेठ गेणू पाडेकर यांना समजताच त्यांनी आम्हाला मतद केली. त्यातूनच पुढं आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न जवळपास संपला.
![Vegetables](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-07-2024/farmersuccessstory_12072024131548_1207f_1720770348_692.jpg)
30 एकर क्षेत्र ठिबक सिंचनावर : दोन वर्षांनंतर डाळिंबाचं उत्पन्न निघालं. मग त्या उत्पन्नावर खडकाळ माळरानावर बागायती शेती उभी करण्याचा प्रवास सुरू झाला. तब्बल अठरा एकरवर माती टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जवळीलच दोन एकर क्षेत्रातून माती काढून दुसरं क्षेत्र तयार केलं. खडकाळ माळरानावर माती टाकल्यानं तेथे डाळिंब, आंबा, सीताफळाची पीकं लावली. मात्र, पीके वाढल्यानं पाणी कमी पडू लागले. पुन्हा तिसर्या शेततळ्याच्या निर्मितीचा निर्णय घेतला. तब्बल सात कोटी लिटर क्षमता असणार्या शेततळ्याची निर्मिती केली. या जोरावर 25 ते 30 एकर क्षेत्र ठिबक सिंचनावर आणलं. काळ्या आईची सदैव सेवा करुन माळरानाचं अक्षरशः नंदनवन केलं. त्यात आमच्या कुटुंबानं रक्ताचं पाणी करत घाम गाळला. त्यातून समृद्ध शोतीचा विकास करत आमच्या कुटुंबाला सहारा मिळाला.
![Farmer land on Malrana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-07-2024/farmersuccessstory_12072024131548_1207f_1720770348_1077.jpg)
समृद्ध शेती करण्यासाठी संघर्ष : शेती समृद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मात्र, वेळोवेळी धाडसी निर्णय घेण्यात आल्यानं यशही मिळालं. त्यासाठी धाकटा भाऊ प्रकाश यांची भक्कम साथ मिळाली. वकिलीचं शिक्षण झालं असले तरी माझ्या खांद्याला खांदा लावून शेती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. यासाठी माझी पत्नी सरस्वती तसंच वहिनी प्रतिभा या कुटुंबाला साथ देत आहेत. केवळ पारंपरिक पद्धतीनं शेती करणं शक्य नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सक्षमपणं वापर करणं आवश्यक आहे. मी आणि माझ्या कुटुंबानं शेतीला एक नवा आयाम दिला. सध्या आमच्या शेतात चार शेततळं आहेत.
![Farms built by farmers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-07-2024/farmersuccessstory_12072024131548_1207f_1720770348_690.jpg)
सौरऊर्जेचा स्वतंत्र प्रकल्प : आमच्याकडं एकूण 37 एकर क्षेत्र आहे, त्यापैकी 18 एकर शेतीसाठी सुधारित करण्यात आली आहे. यामध्ये सात एकर टोमॅटो, चार एकर फुलं, दहा एकर डाळिंब, एक एकर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सौरऊर्जेचा स्वतंत्र प्रकल्पही उभारण्यात आला आहे. पोखरकर कुटुंबाचा शेतीचा प्रवास असाच सुरू राहणार आहे. त्याची दखल घेत अनेक संस्थांनीही पुरस्कार देऊन बळ दिलं आहे, रत्नाकर पोखरकर यांनी सांगितलं.