नाशिक - मुंबईतील बोट अपघातात 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात दम्याच्या आजारावर उपचारासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील राकेश अहिरे दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबईला गेले होते. रुग्णालयात उपचार घेऊन ते गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटीने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी निघाले होते. परंतु,नौदलाच्या स्पीडबोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातातील मृतांमध्ये अहिरे कुटुंबातील या तिघांचा समावेश आहे.
नाशिकच्या पिंपळगाव येथील रहिवासी असलेले अहिरे कुटुंबातील पाच वर्षाचा मुलगा निधेश याला दम्याचा आजार होता. त्याच्यावर मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासाठी त्याचे वडील राकेश अहिरे, हर्षदा अहिरे हे मुलगा निधेशला घेऊन मुंबईत आले होते. उपचारानंतर नाशिकला येण्याआधी राकेश अहिरे हे पत्नी हर्षदा यांच्या माहेरी थांबणार होते. त्याआधी गेटवे ऑफ इंडियाजवळ जल सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. अशात मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात स्पीड बोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला. यात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात नाशिक येथील अहिरे दाम्पत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पिंपळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू - नौदलाच्या स्पीडबोटने प्रवासी बोटीला धडक दिल्यानंतर प्रथम राकेश अहिरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पथकाने हर्षदा आणि पाच वर्षांचा चिमुकला निधेश याला रेस्क्यू करून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
5 लाखांची मदत देणार - मुंबई शहरातील प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या बोट अपघाताप्रकरणात मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा..