ठाणे : कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकवर दोन खोके आहेत. त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगारानं बुधवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी साडे अकरा वाजता कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. यानंतर कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीनं रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी केली आणि ते दोन्ही खोके ताब्यात घेतले. पुढे पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. श्वानांच्या साहाय्यानं या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती? ती कोणी आणून ठेवली? स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता?, अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकानं तपास सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक आधार घेऊन सुरू केला.
पैशाची बॅग समजून चोरली स्फोटकांची बॅग: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वे स्थानकात स्फोटके सोडून पळालेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला. यानंतर जॉन जॉय डेव्हिड याला बदलापूरमधून अटक केली तर त्याचा साथीदार ह्रषिकेश याला भिवंडीतून सापळा रचून अटक केली. या दोन्ही आरोपींकडे स्फोटकांबाबत लोहमार्ग पोलिसांनी अधिक चौकशी केली. दरम्यान, ते घटनेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीला गावी पाठविण्यासाठी पहाटेच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात आले होते. त्यावेळी दोन चोरट्यांना ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवाक खाली एक जोडपं झोपलेलं दिसलं. त्या जोडप्याकडे पैश्यांनं भरलेली बॅग असल्याचा समज या दोन्ही चोरट्यांना झाला. यानंतर त्यांनी या जोडप्याची बॅग झोपेत असताना पळवली. त्यानंतर लोकलने कल्याण रेल्वे स्थानकात येऊन बॅगमधील इतर साहित्य दोन्ही चोरट्यांनी घेतली. मात्र, बॅग मधील दोन बॉक्स उघडून पहिले असता, स्फोटके (डिटोनेटर्स) असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी दोन्ही बॉक्स कल्याण रेल्वे स्थानकात सोडून पळ काढल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघडकीस आलं.
सुरुंग स्फोटासाठी वापरली जात होती स्फोटके: ही स्फोटके दगड खाणीच्या खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी, विहिरी खोदण्यासाठी वापरली जातात, अशा क्षमतेची आहेत. या स्फोटकांचा तातडीनं स्फोट होत नाही. ती डिटोनेटर्स जिलेटीन कांड्यांसारखी असतात. त्यांना वात असते. ती स्फोटकांशिवाय स्फोट करत नसल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील यांनी घटनेच्या दिवशी सांगितलं होतं. दरम्यान, दोन्ही चोरट्यांना अटक करून आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. या घटनेचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे.
हेही वाचा: