नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीकरिता राज्यातील 48 जागांवर पाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोण जायंट किलर ठरणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला लागणार आहेत. त्यापूर्वी विविध संस्थांनी एक्झिट पोलमधून निकालाचे अंदाज वर्तविले आहेत.
- टाईम्स नाऊ ईटीजीच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत असणार आहे. या पोलनुसार एनडीएला 26 तर इंडिया आघाडीला 22 जागा मिळणार आहेत.
- न्यूज 18 च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात एनडीएला 32 ते 35 जागा मिळणार आहेत. तर इंडिया आघाडीला 15 ते 18 जागा मिळणार आहेत.
- रिपब्लिक PMARQ अंदानुसार एनडीएला 29 जागांवर विजय मिळेल. तर इंडिया आघाडीला 19 जागावर विजय मिळेल.
यंदा शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या दोन्ही पक्षांचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत आमने-सामने उभे राहिले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी ( अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यात लढत झाली. एनडीएमध्ये सर्वाधिक जागांवर म्हणजे 28 मतदारसंघावर भाजपान निवडणूक लढविली. तर शिवसेनेनं ( एकनाथ शिंदे गट) 14 मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पाच मतदारसंघात निवडणूक लढविली. इंडिया आघाडीत सर्वाधिक जागांवर म्हणजे 21 जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं निवडणूक लढविली. तर काँग्रेसं 17 मतदारसंघात तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 10 मतदारसंघात निवडणूक लढविली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत काय चित्र होते?2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 48 पैकी 23 जागांवर विजय मिळाला होता. तर शिवसेनेला 18 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळवता आला होता. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 23 तर शिवसेनेला 18 जागावर विजय मिळाला होता. तर राष्ट्रवादीला चार तर काँग्रसेला दोन जागांवर विजय मिळविता आला होता.
काय आहेत राजकीय प्रतिक्रिया? उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी एनडीए सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. मंत्री सामंत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली सत्ता कायम ठेवणार आहेत. तर मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सर्व जागा महायुती आघाडी जिंकणार आहे. एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नाहीत, असं काँग्रेसनं जाहीर केलं होतं. त्यांचा आधीच पराभव झाल्याचं आम्ही म्हटलं होतं. काँग्रेसनं आता लाजेनं एक्झिट पोलवरील चर्चेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव होणार आहे." काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडी 295हून जास्त जागांवर विजय मिळवेल असा दावा केला. त्यावर मंत्री सामंत म्हणाले, " काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडू नये आणि त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी खर्गे यांनी तसे विधानं केलं. 4जूनला निकालानंतर सर्व स्पष्ट होईल." काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्झिट पोलच्या आकडेवारीवर अवलंबून नसल्याचं म्हटलं. इंडिया आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
4 जूनच्या निकालाकडं सर्वांचे लक्ष-राज्यात इंडिया आघाडी ही महाविकास आघाडी तर एनडीए ही महायुती म्हणून ओळखली जाते. महायुतीनं राज्यात 40 हून अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत तर भाजपाला देशात 400 हून जागा मिळतील, असा भाजपानं दावा केला. तर इंडिया आघाडीनं भाजपाचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असल्यानं राज्यातील लोकसभा निकालावर राष्ट्रीय राजकारणाची समीकरणे ठरतात. त्यामुळे 4 जूनच्या निकालाकडं सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा-