अमरावती Exam Paper Leaked : जलसंधारण विभागाच्या वतीनं विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. मात्र, अमरावती येथील सिटी लँड परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मृद, जलसंधारण विभागातील एका कर्मचाऱ्यानं प्रश्नपत्रिका फोडून उत्तरं देण्यात मदत केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
विद्यार्थ्याला घेतलं ताब्यात : अमरावती शहरातील सिटी लँड परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता परिक्षेचा पेपर फुटला आहे. परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याकडं प्रश्नपत्रिकेतील उत्तरं सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या विद्यार्थाला नांदगाव पेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
हॉल तिकिटाच्या मागील बाजूस प्रश्नांची उत्तरे सापडलेल्या विद्यार्थ्याला नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली. विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर प्रश्नपत्रिकेतील उत्तरांची माहिती कोठून मिळाली, याची चौकशी करण्यात येणार आहे. तपासानंतर या प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे, याची माहिती लवकरच दिली जाईल. - सागर पाटील, पोलीस उपायुक्त
काय आहे प्रकरण : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद, जलसंधारण विभागानं विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. यासाठी मृद-जलसंधारण विभागानं 9 फेब्रुवारी रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार मृद -जलसंधारण विभागाची परीक्षा 20 तसंच 21 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. मात्र, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटला आहे. त्यामुळं पुन्हा एका परीक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
परीक्षार्थींनी परीक्षेवर घेतला आक्षेप- विशेष म्हणजे मृद-जलसंधारण विभागातील एका कर्मचाऱ्यानं प्रश्नपत्रिका फोडून उत्तरं देण्यात मदत केल्याचं समोर आले आहं. हा प्रकार लक्षात येताच इतर परीक्षार्थींनी परीक्षेवर आक्षेप घेतला. त्यामुळं परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तर आधीच कसे फुटले, असा सवाल त्यांनी केला. परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळामुळं पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या पथकानं परीक्षा केंद्रावर धाव घेतली.
हे वाचलंत का :