नवी दिल्ली Rajiv Kumar Shayari : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (16 मार्च) नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. ते म्हणाले की, देशभरात एकूण सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला, तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी, चौथ्या टप्प्याचं मतदान 13 मे रोजी, पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे, तर मतमोजणी 4 जून रोजी होईल. दरम्यान, या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची काव्यात्मक शैलीही पाहायला मिळाली.
काय म्हणाले राजीव कुमार? : पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांना वैयक्तिक टीका टाळण्याची आणि प्रचारादरम्यान शिष्टाचार राखण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी प्रसिद्ध उर्दू कवी बशीर बद्र यांचा एक शेर ऐकवला. ते म्हणाले की, 'दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाऐ तो शर्मिंदा न हों!' तसंच आजकाल खूप लवकर मित्र आणि शत्रू बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं पक्षांनी इतकं घाणेरडं बोलू नये की ते एकमेकांचे शत्रू बनतील, असा सल्ला त्यांनी दिला.
राजीव कुमार यांचा शायराना अंदाज : पुढं ईव्हीएम संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राजीव कुमार म्हणाले की, "ईव्हीएमवर प्रश्न येणार, हे मला माहीत होतंच. त्यामुळं मी त्याविषयी काही ओळी लिहिल्या आहेत. 'अधुरी हसरतो का इल्जाम, हर बार हम पे लगाना ठीक नही, वफा खुद से नही होती, खता ईव्हीएम की कहते हो', अशी शायरी राजीव कुमार यांनी ऐकवली. तसंच ईव्हीएममुळं आज छोट्या-छोट्या राजकीय पक्षांचीही दखल घेतली जात आहे. मतपत्रिकेच्या काळात छोट्या पक्षांना दाबलं जायचं. सर्व ईव्हीएम मशीनची तीन वेळा तपासणी केली जाते. ईव्हीएम मशीन आल्यानंतर सत्तेत असणाऱ्या पक्षांना कितीवेळा सत्तेतून पायउतार व्हावं लागलं, याची माहिती देखील निवडणूक आयोगाच्या पुस्तकात दिली आहे, असंही राजीव कुमार यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -