नागपूर Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाचे नागपूर येथील उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान नितीन गडकरीच्या रॅलीत काही शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी केल्याचं आढळून आल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडं एक तक्रार दाखल केली. त्या संदर्भात चौकशीनंतर निवडणूक आयोगाकडून कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
नितीन गडकरी यांच्या सभेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग आढळून आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगानं शाळेवर कारवाईचे आदेश जारी केले. मात्र निवडणूक आयोगानं प्रस्तावित केलेली ही कारवाई चुकीची आहे. उमेदवारावरही कारवाई करण्यात यावी - अतुल लोंढे, प्रवक्ते काँग्रेस पक्ष
आदर्श आचार संहितेचं उल्लंघन : नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्यानं आदर्श आचार संहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेनी केली होती. अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडं 3 एप्रिलला तक्रार दाखल केली होती. नितीन गडकरींच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणीही अतुल लोंढे यांनी केली होती.
आरोप सिद्ध, कारवाईचे आदेश : नितीन गडकरी यांच्या प्रचार रॅलीत विद्यार्थ्यांचा सहभाग केल्याचं उघडकीस आलं होतं. या प्रकरणी आरोप सिद्ध झाल्यामुळे निवडणूक आयोगानं कारवाईचे आदेश दिलेले आहेत. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी सुरू असून लवकर कारवाई केली जाणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नितीन गडकरीच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांचा अनावश्यपणे वापर केल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे. अतुल लोंढेनी केलेले आरोप सिद्ध झाल्यानं शाळेच्या संचालकावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यामिक) यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कारवाईचे निर्देश, मुख्याध्यापक अडचणीत : भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. वैशाली नगरच्या एनव्हीएम फुलवारी शाळा, संचालक आणि मुख्याधापिकेवर नितीन गडकरी यांच्या प्रचारात शालेय मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केल्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितीन गडकरी यांच्यावर कारवाई करा : "आचार संहिता भंग केल्यामुळे निवडणूक आयोगानं शाळेवर कारवाई केली, त्याबाबत आम्ही त्यांचे आभारी आहोत. सदरची कारवाई म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा प्रकारची म्हणता येईल, असा हल्लाबोल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. "शाळेतली मुलं भर उन्हामध्ये सभेसाठी उभे ठेवणं अशा उमेदवाराच्या दबावशिवाय, होऊ शकत नाही. निवडणुकीत मुलांचा वापर करता येणार नाही, असं निवडणूक आयोगाकडून पहिलंच स्पष्ट सांगण्यात आलं होतं. तरी मुलांचा वापर करण्यात आला. कारवाई कोणावर तर संचालक, मुख्याध्यापकावर करण्यात येणार आहे. मात्र सदरची कारवाई ही उमेदवारावर झाली पाहिजे. उमेदवारानं आचारसंहितेचा भंग केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार सातत्यानं घडत आहे. देशात कायदा आहे की नाही, संविधानाचं पालन होणार आहे की नाही, निवडणूक आयोग काहीतरी वेगळंच करणार असं दिसत आहे," असं अतुल लोंढे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :