मुंबई Uddhav Thackeray : मंगळवारी उद्या (4 जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असताना राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 20 मे रोजी मुंबई आणि उपनगरात मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. आचारसंहितेचा भंग केला म्हणून भाजपा नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली असून, उद्धव ठाकरेंवर कारवाई करा असे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. त्यामुळं आता याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
का घेतली पत्रकार परिषद? : 20 मे रोजी मुंबईसह 13 ठिकाणी लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले. यावेळी मुंबईतील अनेक भागात संथगतीचं मतदान सुरु होतं. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, वीज खंडित झाल्याचे प्रकार घडले. हे मुद्दामहून केलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्या ठिकाणी संथगतीनं मतदान सुरू आहे, तिथे मतदान करण्याची वेळ वाढवून मिळावी असं म्हणत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावरती बोट ठेवत ठाकरेंनी टीका केली होती. यानंतर मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेणं हे आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रकार असल्याचं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली होती. तसेच याबाबत उद्धव ठाकरेंवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेलारांनी तक्रारीत केली होती.
पत्रकार परिषद भोवणार? : आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं गंभीरित्या घेतल्याचं दिसतंय. तक्रार केल्यानंतर त्यातील सत्यता पडताळून निवडणूक आयोगानं पाहिली आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला असं निवडणूक आयोगानं म्हणत त्यांच्यावर कारवाई करावी करण्याचं आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार का? उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कायद्यासमोर सगळे सारखेच : उद्धव ठाकरे यांच्यावरील कारवाईच्या बातमीनंतर सत्ताधारी-विरोधकाकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून, उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला होता, याची सत्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने पडताळून पाहिली आहे. म्हणूनच त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. शेवटी कायद्यासमोर सगळेच सारखेच असतात. आमच्या पक्षातूनही असं कोणी केलं असतं तरी देखील निवडणूक आयोगानं त्यांच्यावरही कारवाईचे आदेश दिले असते. असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय.
पराभवाच्या भीतीमुळं : दुसरीकडं देशात आणि महाराष्ट्रात यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे. त्यामुळं हे पळवाटा काढून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या संथगतीनं मतदान सुरू होते. त्यावर बोलणं किंवा पत्रकार परिषद घेणं हा आचारसंहितेचा भंग होत असेल तर मग तुम्ही धर्माच्या नावावरती मतं मागितली. बजरंग बली जय असं मोदी-शहांनी कर्नाटकमध्ये म्हटलं होतं. हा आचारसंहितेचा भंग होत नाही का? असा सवाल शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय. त्यामुळं पहिली कारवाई मोदी आणि शहांवर निवडणूक आयोगानं केली पाहिजे, असं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तसेच कायद्यासमोर सगळे सारखेच असतात मग सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कुठलीही तक्रार दाखल केली तर त्याची त्वरित दखल घेतली जाते. मात्र आम्ही तक्रार दाखल केली तर आमची दखल घेतली जात नाही. असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद, नेमकं कारण काय? - EC Press Conference
- उमेदवारांच्या चिल्लर स्टंटबाजीला चाप; फक्त 'इतकीच' चिल्लर ग्राह्य धरणार - Lok Sabha Election 2024
- 'आम्ही उद्धव ठाकरेंसोबत'; राजन साळवी यांच्यावरील कारवाईवर वैभव नाईक, विनायक राऊत यांची प्रतिक्रिया