पुणे Pune Drug Smuggling Case : ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी पुणे तसेच दिल्ली इथं कारवाई करत तब्बल 1700 किलो एमडी ड्रग्ज पकडलं आहे. या पकडण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची आहे. ड्रग्ज प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. दिल्लीत करण्यात आलेल्या कारवाईत कुरिअर कंपनीच्याद्वारे काही ड्रग्जसाठा लंडन इथं पाठवण्यात येणार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांनी 8 तस्करांना अटक केली आहे. हे सर्व तस्कर कोडींगद्वारे संभाषण करत असल्याचं समोर आलं आहे. यात लंबा बाल, मुंबई का बंदर अन् नमक पार्सल असं कोडींग केल्याचं पोलीस तपासात पुढं आलं आहे.
लंबा बाल, मुंबई का बंदर अन् नमक पार्सल : लंबा बाल, मुंबई का बंदर, नमक पार्सल अशा स्वरूपाच्या कोडींगद्वारे हे सर्व आरोपी एकमेकांशी संपर्कात होते. मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी या टोळीकडून प्रत्येकाला टोपण नाव देण्यात आलं होतं. सराईत गुन्हेगार वैभव माने याला केसांची शेंडी असून त्याला 'लंबा बाल' म्हणून ओळखलं जात होतं. तसेच मुंबईत राहणारा आरोपी युवराज भुजबळ याला 'मुंबई का बंदर' म्हणून ओळखलं जात होतं. मेफेड्रॉनची तस्करी ही मिठाच्या गोण्यांमधून केली जात होती. 30 ते 40 किलो मिठाच्या गोणीत एक किलो मेफेड्रॉनचा बॉक्स ठेवून 'नमक पार्सल' असं कोडिंग वापरलं जात होतं. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात यश आलं आहे.
या तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या : पुणे पोलिसांनी या प्रकरणी वैभव उर्फ पिंटया भारत माने ( वय 40 रा., सोमवार पेठ,पुणे ) अजय आमरनाथ करोसिया ( वय 35 वर्ष रा भवानीपेठ, पुणे ) हैदर नूर शेख, ( वय-40 वर्ष रा. विश्रांतवाडी, पुणे) , भिमाजी परशुराम साबळे ( वय-46 वर्षे रा. पुणे ) , युवराज बब्रुवान भुजबळ ( वय-41 वर्षे रा. डोबिंवली वेस्ट, मुंबई ) , दिवेश चिरंजीत भुटिया ( रा. नवी दिल्ली ) , संदिप राजपाल कुमार ( रा. नवी दिल्ली ) यांना अटक केली आहे. मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचं कोडिंग केलं होतं. त्याद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
सांगलीत 140 किलो एमडी जप्त : पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुणे, दिल्लीनंतर आता सांगलीपर्यंत पोहोचलं असून काल सांगली इथं केलेल्या कारवाईत 140 किलो 'एमडी' (मेफेड्रॉन) या ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्याचा बाजारभाव 280 ते 300 कोटी रुपये एवढा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :