नाशिक/ठाणे Dombivli Blast : मुंबईच्या डोंबिवली एमआयडीसीत गुरुवारी झालेल्या रासायनिक कारखान्यातील स्फोट प्रकरणी कारखाना मालक मालती प्रदीप मेहता व मलय प्रदीप मेहता यांना ठाणे व नाशिक गुन्हे शाखेनं नाशिक मधून ताब्यात घेतलं. डोंबिवली इथं काल झालेल्या रासायनिक कारखान्याच्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता.
नाशिकमध्ये नातेवाईकाच्या घरुन अटक : डोंबिवली एमआयडीसीत गुरुवारी झालेल्या रासायनिक कारखान्याच्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर कारखाना संचालक मालती प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष म्हणून शोधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहता यांनी पोलिसांना गुंगारा देत त्या फरार झाल्या होत्या. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन त्यांचा शोध घेतला असता त्या नाशिक मधील त्यांच्या एका नातेवाईकाकडं असल्याचं समजताच नाशिक व ठाणे गुन्हे शोध पथकानं त्यांना तिथून ताब्यात घेतलं.
मेहता यांना घेऊन ठाणे पोलीस रवाना : नाशिक युनिट एक व ठाणे पोलिसांनी संयुक्त तपास करुन नातेवाईकांकडं आश्रय लपून बसलेल्या मालती मेहता यांना ताब्यात घेऊन ठाणे पोलीस त्यांना घेऊन रवाना झाले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली असल्याचं मधुकर कड यांनी सांगितलं.
गुरुवारी दुपारी भीषण स्फोट : डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान या हार्डनर बनवणाऱ्या कंपनीतील रिॲक्टरचा गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यामुळं शेजारील कंपन्या, दुकानं आणि रहिवासी इमारतींचं मोठं नुकसान झालं. शेजारील कंपन्यांमध्ये आग पसरली तर स्फोटामुळं अनेक दुकानांच्या आणि रहिवासी इमारतीमधील घरांच्या काचा फुटल्या. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याचं समजतं.
हेही वाचा :