छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजीनगर शहरात पती-पत्नीचं भांडण झालं. भांडण करणारे नवरा बायको दोघेही डॉक्टर आहेत. शेजाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यानं इमारतीमध्ये राहणाऱ्या इतर लोकांचा जीव वाचवला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पतीने दिलेल्या तक्रारीनंतर डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
भांडण झाल्याने पेटवल घर : सिडको एन २ ठाकरे नगर येथील नालंदा आपारमेंट मध्ये डॉ. गोविंद आणि डॉ. विनीता वैजवाडे हे डॉक्टर दांपत्य वास्तव्यास आहे. डॉ गोविंद खाजगी रुग्णालयात काम करतात. तर डॉ विनीता आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. रविवारी रात्री अकराच्या सुमारास दोघांमध्ये अचानक भांडण झाले. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनी दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉ. गोविंद घरातून निघून गेले, तर पत्नी विनीतानं आपले सामान घेऊन नांदेडला जायचं अस सांगत शेजाऱ्याला रुग्णालयात सोडण्यास सांगितलं. त्यानंतर डॉ गोविंद काही वेळाने घरी परतले. मात्र सकाळी सहा वाजता विनीता पुन्हा घरी परतल्या. त्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, डॉ गोविंद यांनी दरवाजा उघडला नाही. तर शेजाऱ्याला फोन करून जीवाला धोका असल्याचं सांगितलं. त्यावर शेजारी आल्यावर त्यांनी दरवाजा उघडला. मात्र त्यावेळी डॉ. गोविंद रस्त्यावर पळून आले. डॉ विनीतानं आपले काही सामान काढले. महिला डॉक्टर बेडरूमध्ये असलेल्या बेड, कपाटाला आग लावून घराबाहेर पडल्या.
शेजाऱ्यांमुळे वाचली इमारत : घरातील साहित्य पेटवल्यानंतर पूर्ण बेडरूमला आग लागली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करत इतर लोकांना बाहेर येण्यास सांगितले. आग लागलेल्या घरातून गॅस सिलेंडर बाहेर काढले. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेत एसी, टिव्ही, कुकर, दोन फ्रिज, कपाट, शोकेस आणि इतर साहित्य जाळून खाक झाले. या प्रकरणी डॉ. गोविंद वैजवाडे यांनी सोमवारी रात्री मुकुंदवाडी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पत्नी डॉ. विनीता यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांनी दिली.
हेही वाचा :