अमरावती : राज्यात सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीचा उत्सव आनंदात साजरा होत असताना अमरावती शहरात तपोवनातील कुष्ठरोग्यांच्या कर्मभूमी सोबत 38 वर्षांपासून स्नेहबंध जोपासणारे सेवानिवृत्त पोस्ट मास्तर दुर्गादास चांदुरे यांच्यासोबत आज विविध क्षेत्रातील अनेक मंडळी जुळली. विशेष म्हणजे या सर्वांनी मिळून तपोवनात अनोखी दिवाळी साजरी केली.
अशी सुरू झाली तपोवनातील विशेष दिवाळी : 1984 मध्ये पोस्टमन असणारे दुर्गादास चांदूरे यांनी तपोवनातील त्यावेळी असणाऱ्या अनाथ मुलांच्या शाळेत दिवाळीच्या पर्वावर फराळ वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला. विशेष म्हणजे त्याकाळी मित्रांच्या घरी फराळाला आमंत्रित केलं जायचं. आमच्या मित्रांना दोन प्लेट बांधून द्या, अशी विनंती करून अनेक मित्रांकडून येणारा हा फराळ आणि घरातला फराळ दुर्गादास चांदुरे हे तपोवनातील अनाथ मुलांच्या शाळेत वाटून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायचे. आता त्यांच्या ह्या उपक्रमाला भव्य स्वरूप आलं असून त्यांचा शिक्षक असणारा मुलगा दीपक चांदुरे आणि 2000 मध्ये दीपकसोबत शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी 'स्नेहबंध' नावानं संस्था स्थापन करून तपोवनातील दिवाळी साजरी करण्याची प्रथा कायम जोपासली. स्नेहबंध परिवारामध्ये कुणी प्राध्यापक आहेत, तर कोण डॉक्टर आहेत. व्यवसायिक, पोलीस, विमा प्रतिनिधी, अभियंते म्हणून कार्य करणारे अनेकजण या संस्थेत आहेत. या स्नेहबंध परिवारातील काही सदस्य आज उदरनिर्वाहासाठी बाहेर वास्तव्याला असले, तरी दीपोत्सवानिमित्त ते दरवर्षी एकत्र येतात आणि तपोवनात विशेष दिवाळी साजरी करतात.
आदिवासी विद्यार्थ्यांना दिलं स्पेशल गिफ्ट : तपोवन ही कुष्ठरोग्यांची तपोभूमी असून या ठिकाणी शासनाकडून कुठलंही अनुदान मिळत नाही. असं असताना सेवाभावी संस्था, कुटुंबांकडून मिळणाऱ्या मदतीवरच तीन, चारशे कुष्ठरोगी बांधवांसह सुमारे साडेसहाशेच्यावर असणारे येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं भोजन, निवास अशी व्यवस्था केली जाते. स्नेहबंध परिवाराच्यावतीनं यावर्षी मेळघाटातील 50 आदिवासींसाठी सुरू झालेल्या निवासी शाळेकरता वॉटर फिल्टर आणि वॉटर कुलर भेट स्वरूपात देण्यात आला. यासोबतच खुर्च्या चटई आणि इतर गरजेच्या वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या.
चिमुकल्यांच्या हातून मिष्ठांन्न वाटप : स्नेहबंध परिवारातील सदस्यांच्या चिमुकल्यांच्या हातून तपोवनातील कुष्ठरोगी बांधवांना मिष्ठांन्न वाटप करण्यात आलं. भावी पिढीला देखील सामाजिक दायित्वाची जाण व्हावी, या उद्देशानं स्नेहबंध परिवारातील मंडळींनी आपल्या चिमुकल्यांना देखील मोठ्या संख्येनं या अनोख्या दिवाळी मिलन सोहळ्यात सहभागी केलं.
समाजाच्या मदतीची गरज : "विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या वतीनं 1950 मध्ये पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी अमरावतीत तपोवनची स्थापना केली. या संस्थेला सरकारच्या वतीनं कुठल्याही स्वरूपात अनुदान मिळत नाही. एखादा रुग्ण बेडवर असेल, तर महिन्याकाठी दोन हजार रुपये मिळतात. मात्र त्यातून साडेतीनशे एकर पसरलेल्या या तपोवनाचं व्यवस्थापन हवं तितकं शक्य होत नाही. यामुळंच तपोवनाला सामाजिक मदतीची गरज आहे. अनेक दानदाते जी काही मदत करतात त्यातून आणि तपोवनात कुष्ठरोगी बांधवांकडून तयार केलं जाणारं फर्निचर, कापड यांच्या विक्रीतून जे काही उत्पन्न मिळतं, त्यातून सारं काही भागवण्याचा प्रयत्न केला जातो," असं तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवळी यांनी सांगितलं.
हेही वाचा