अमरावती : दिवाळीच्या पर्वावर अमरावती शहरातील 'रघुवीर मिठाई' प्रतिष्ठानच्या वतीनं बाजारात 'सोन्याची मिठाई' विक्रीसाठी आणली आहे. 'सुवर्ण भोग' असं या मिठाईचं नाव असून, 14 हजार रुपये किलो अशी या मिठाईची किंमत आहे. सध्या अमरावतीत या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे. ही मिठाई महाग असली तरी दिवाळीनिमित्तानं खरेदीसाठी अनेकजण गर्दी करत आहेत.
'अशी' आहे सुवर्ण भोग मिठाई : उच्च दर्जाच्या मामरा, बदाम, पिसोरी, पिस्ता, काजू आणि शुद्ध केशरसह 24 कॅरेट सोन्याचा अर्क लावून ही मिठाई तयार करण्यात आली. दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसादाच्या स्वरूपात या मिठाईचा भोग लावता यावा, यासाठी या मिठाईचं नाव 'सुवर्ण भोग' असं ठेवल्याचं 'रघुवीर मिठाई'चे संचालक दिलीप पोपट यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
अमरावतीसह राज्याच्या विविध भागातून मागणी : गत तीन ते चार वर्षांपासून दिवाळीच्या पर्वावर खास तयार केल्या जाणाऱ्या या मिठाईला अमरावतीसह विविध भागातून मागणी आहे. यावर्षी अमरावती, अकोला, नागपूर, मुंबई, पुणे, दिल्ली आणि अमेरिकेत देखील मिठाई जाणार असल्याची माहिती संचालकांनी दिली.
मिठाईसाठी स्पेशल बॉक्स : 'सुवर्ण भोग' या खास मिठाईसाठी दिल्ली आणि मुंबई येथून स्पेशल बॉक्स मागवण्यात आले आहेत. या बॉक्समधून ही मिठाई खरेदी करणाऱ्यांना दिली जाणार आहे. एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी देखील ही मिठाई आकर्षक गिफ्ट हॅम्पर्सद्वारे देता येईल. या 'सुवर्ण भोग' मिठाईसोबतच गिफ्ट हॅम्पर्स देखील प्रतिष्ठा वाढवणारे आहे.
'या' ठिकाणी आहे मिठाई उपलब्ध : दिवाळीच्या निमित्तानं 'रघुवीर मिठाई' प्रतिष्ठानच्या वतीनं खास राजस्थानच्या कारागिरांकडून तयार करण्यात आलेली 'सुवर्ण भोग मिठाई' ही रघुवीरच्या अमरावती शहरातील पाचही प्रतिष्ठानमध्ये उपलब्ध आहे. सांगली आणि मिरजच्या शाखेत देखील ही मिठाई उपलब्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा -