अमरावती Tumoor App For Cancer Diseases : मोबाइल 'ॲप'वर कार्टून स्टोरी पाहून घातक कॅन्सरशी संबंधित आजारांची महत्त्वाची माहिती देणारे 'टूमोर' हे खास ॲप्लिकेशन 30 जून रोजी लॉन्च होणार आहे. 'न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड रिसर्च अँड वर्क रिसर्च अँड इनोवेशन' या संशोधन केंद्राच्या वतीनं हे खास ॲप 30 जून रोजी सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य व्यक्तींना कर्करोगासारख्या गंभीर आजाराची माहिती पहिल्याच टप्प्यावर ॲप्लिकेशनमधून मिळणार आहे.
स्टोरी टेलिंगद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास : "कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी मोठा लढा देण्यापेक्षा पहिल्याच पायरीवर त्याचा नायनाट करणं शक्य होईल", असा विश्वास डॉ. केतकी काळेले-भोकरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला. "आपण लहानपणी ऐकलेल्या ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे अनेक गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी आठवतात. एखाद्या आजारासंदर्भात स्टोरी टेलिंगद्वारे अशा आजाराची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यास समाजात जागृकता निर्माण होईल," असं त्या म्हणाल्या. त्यामुळं एकूण 40 प्रकारच्या कॅन्सर संदर्भातील स्टोरी या 'टूमोर'द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्टोरीमधील कॅरेक्टर विविध 'ट्युमर्स' असणार आहेत. यामध्ये शरीरातील काही गाठींचा देखील समावेश आहे. सिंड्रेलाची स्टोरी असो किंवा ससा कासवाची स्टोरी अशा आपण लहानपणी ऐकलेल्या विविध गोष्टींमध्ये ट्युमरसारखे कॅरेक्टर वापरून कर्करोगासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती यातून नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
विविध आजारांसंदर्भात माहिती देणारे ॲप : 30 जून रोजी नागपूर येथील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर आनंद पाठक यांच्या हस्ते टूमोर ॲपचा शुभारंभ करण्यात येणार आहे. टूमोर ॲपनंतर आम्ही पुढच्या टप्प्यात मनुष्याला कर्करोगाव्यतिरिक्त ज्या व्याधी जडतात, त्या व्याधीसंदर्भात देखील जनजागृती करणारे असंच ॲप तयार करण्याचा प्रयत्न करू, असं देखील डॉ. केतकी काळेले यांनी सांगितलं. सध्या हे आपलिकेशन इंग्रजी भाषेत असलं, तरी लवकरच प्रादेशिक भाषेत देखील ते सर्वांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं डॉ. केतकी काळेले म्हणाल्या.
मुख कर्करोगावर संशोधन सुरू : कर्करोगाचं निदान, उपचार अधिक प्रभावी होण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात अधिक स्पष्ट स्वरूपात विद्यार्थ्यांना, समाजाला ज्ञान प्राप्त करण्यासाठी टूमोर हे ॲप्लिकेशन बनविणाऱ्या डॉ. केतकी काळेले मास्टर ऑफ डेंटल सर्जन आहेत. सध्या वर्धा जिल्ह्यातील दत्ता मेघे दंत महाविद्यालयात त्या तोंडातील कर्करोगावर संशोधन करीत आहेत. दंतचिकित्साच्या संदर्भात दिल्ली येथून प्रकाशित होणाऱ्या संशोधन पत्रिकेचं त्यांनी 2020 ते 2022 पर्यंत संपादनही केलं आहे. अमरावती शहरातील न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड रिसर्च अँड वर्क्स रिसर्च अँड इनोव्हेशन या संशोधन केंद्राच्या प्रमुख म्हणून विविध कर्करोगासंदर्भात संशोधनात्मक माहितीवर त्या अभ्यास देखील करीत आहेत.
टूमोर सर्वांसाठी फायदेशीर : 30 जूनला टूमोर आपलिकेशन लॉन्च होणार असून या आपलिकेशनमधील पायाभूत माहिती सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध असेल. कर्करोगासंदर्भातील संशोधनात्मक माहितीसाठी नाममात्र शुल्क करण्यात येणार आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर प्रचंड खर्च टाळण्यासाठी अगदी प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचा नायनाट करण्यास टूमोर आपलिकेशन अतिशय उपयुक्त ठरेल, असं डॉ. केतकी काळेले म्हणाल्या.
'हे' वाचलंत का :