मुंबई CM Eknath Shinde : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय सहाय्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्यभरात गरीब, गरजू रुग्णांना मदत करण्याचा धडाका सुरू केलाय. आतापर्यंत शंभर कोटींपेक्षा अधिक मदत गरजूंपर्यंत पोहोचवली असल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीनं मंगेश चिवटे यांनी केलाय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कशाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळागाळात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी होत असून त्यांची प्रतिमा सुधारली जात आहे.
सहायता कक्षामुळं फडणवीस अस्वस्थ? : मुख्यमंत्री सहायता निधी सरकारचा निधी असला, तरी त्यामुळं केवळ मुख्यमंत्र्यांचं महिमा मंडन होताना दिसत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या प्रसिद्धीमुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे. वास्तविक मुख्यमंत्री सहायता कक्ष हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच सुरू झाला होता. मात्र, त्याचा खऱ्या अर्थानं राजकीय लाभ घेताना मुख्यमंत्री शिंदे दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषण आनंद गायकवाड यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्र्यांचा वेगळा कक्ष? : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर गरीब रुग्णांसाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची स्थापना केली आहे. याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. राज्य सरकारनं निर्धन, दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत, सवलतीच्या दरानं वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता योजना तयार केली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयानं त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटापैकी दहा टक्के खाटा निर्धार रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी राखून ठेवणं बंधनकारक आहे. मात्र, अनेक धर्मादाय रुग्णालयांमधून या योजनेला हरताळ फासला जात आहे. अशा अनेक तक्रारी सरकारकडं प्राप्त झाल्या आहेत.
राज्य सरकार विशेष मदत करणार : त्यामुळं रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार व्हावेत, यासाठी आता राज्य सरकारचा विशेष मदत कक्ष प्रयत्न करणार असल्याची माहिती या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. रामेश्वर नाईक हे गेल्या वीस वर्षांपासून रुग्णांना मदत करण्यासाठी विविध रुग्णालयांसोबत संपर्क साधून समाजसेवा करत असतात. मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं रामेश्वर नाईक हे गेले अनेक वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर या कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कक्ष काय करणार काम? : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं विधी, न्याय खातं आहे. त्यामुळं या कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचं नाईक यांनी सांगितलं. या कक्षामार्फत धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा नियमानुसार गरिब रुग्णांना उपलब्ध करून देणे, या रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या खाटांची माहिती मिळवून देणे, आजारावरील उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात उपचाराची सुविधा आहे, याची माहिती देणे, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयांची संपर्क साधून मदत करणे, अशी कामे करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यालयाचं लवकरच उद्घाटन होणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं. निर्धन रुग्णांना एक लाख 80 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा असल्यास मोफत उपचार दिले जाणार आहेत, तर गरीब रुग्णांना 50 टक्के सवलतीच्या दरात उपचार दिले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
वेगळ्या कक्षाची गरज काय? : वास्तविक राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला असताना, अजून वेगळा कक्ष स्थापन करण्याची काय गरज होती? असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हा खटाटोप केला जात असावा, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आलेली खेळी असल्याचंही गायकवाड म्हणाले.
हे वाचलंत का :