मुंबई : अभिनेता सलमान खान पाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला.
धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुख्यमंत्री योगी यांना 10 दिवसांत राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी आलेल्या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसाकडून फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे.
धमक्यांचे सत्र सुरू-मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाला आलेल्या कॉलची तपासणी आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी कथित सोशल मीडिया पोस्टमधून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं घेतली होती. या प्रकरणानंतर बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी आणि अभिनेता सलमान खान यांना धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच आता योगी आदित्यनाथ यांना धमकीचा फोन आल्याने पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू- बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईने यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खंडणीची मागणी करणारा धमकीचा मेसेज काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांना धमकीचा फोन आल्यानं पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत. महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून धमकी प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा-