ठाणे Shivajirao Jondhale News : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे चेअरमन, दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपुर वैद्यकीय उपचार होणं आवश्यक होते. मात्र, शिवाजीराव जोंधळे नियंत्रक असलेल्या विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे (शिवाजीराव यांची दुसरी पत्नी) आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा, मुलगी, सून, जावई यांनी शिवाजीराव यांना वेळोवेळी त्रास दिल्याचा आरोप सागर जोंधळे यांनी केला. तसेच शिवाजीरावर यांना वैद्यकीय उपचार घेण्यापासून वंचित ठेवून त्यांची हत्या केल्याचा दावा सागर जाेंधळे यांनी केलाय.
दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर जोंधळे (ETV Bharat Reporter) पाच जणांवर गुन्हा दाखल : शिवाजीराव यांच्यावर यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गीता खरे यांनी होऊ दिली नाही. त्यामुळं आपल्या वडिलांच्या मृत्यूस गीता खरे कुटुंब कारणीभूत असल्याचा दावा सागर जोंधळे यांनी केला. सागर यांचा हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयानं प्रथमदर्शनी मान्य केला. न्यायालयानं गीता खरे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश विष्णुनगर पोलिसांना दिले आहेत. तर सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या तक्रारीवरून बिएनसी कलम 304, 347, 383, 384, 387, 420 सह कलम 34, 120 (ब) प्रमाणे हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव यांना कायदेशीर विवाह केलेल्या वैशाली या पत्नीपासून चार अपत्य आहेत. समर्थ समाज या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद ते सांभाळत होते. या संस्थेत काही वर्षापूर्वी गीता खरे या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. गिता खरे यांच्याबरोबर शिवाजीराव यांचे संबंध प्रस्थापित होऊन त्यांनी तिच्याबरोबर विवाह केला. शिवाजीराव यांनी स्वमिळकतीमधून शहापूर तालुक्यातील आसनगावसह अनेक ठिकाणी जागा घेऊन तेथे शिक्षण संस्थेची उभारणी केली होती. गीता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना ब्लॅकमेलिंग करून, जोंधळे कुटुंबीयांना अंधारात ठेऊन या सर्व मिळकती स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा आरोप सागर यांनी केलाय. तसंच शिवाजीराव यांना कर्करोगाच्या योग्य उपचारापासून वंचित ठेवलं गेलं. खोटी कारणं डाॅक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवलं. या निष्काळजीपणातून शिवाजीराव यांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला, असंही सागर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.
गुन्ह्याचा तपास सुरू- या गंभीर आरोपानंतर विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे (शिवाजीराव यांची दुसरी पत्नी), वर्षा देशमुख (शिवाजीराव यांची मुलगी), प्रितम देशमुख (जावई), हर्षकुमार खरे (मुलगा), स्नेहा खरे (सून) यांच्या विरुद्ध शनिवारी (17 ऑगस्ट) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मानसिक छळ करणे, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कट रचणे या भारतीय न्याय संहिता कलमानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पवार यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पथकानं सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.