नाशिक Leopard News : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात शिकार करणारा बिबट्या स्वतःच शिकार झाला. विजेच्या डीपीवर बसलेल्या मोराची शिकार करताना अकरा हजार केव्ही व्हॅट विजेचा तीव्र शॉक लागल्यानं बिबट्यासह (Leopard) मोराचा (Peacock) जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेन परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन विभागाने बिबट्यासह मोराचे मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.
मोराचा आणि बिबट्याचा जागीच मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात बिबट्या शिकार करण्यासाठी मोराच्या पाठीमागे लागला असता, यावेळी पानसरे वस्ती येथील आंब्याच्या झाडा जवळील विजेच्या डीपीवर मोर जाऊन बसला. बिबट्याने देखील तिथे झेप घेतली. यावेळी विजेचा शॉक लागताच मोराचा आणि बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती वन विभागाला देताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्या आणि मोराचे मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतला.
बिबट्याची दहशत : गेल्या काही महिन्यांपासून पिंपळगाव बसवंत भागात बिबट्याची दहशत वाढल्यामुळं सकाळी देखील शेतात काम करताना कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाने या भागात पिंजरे देखील लावले होते. अशात बिबट्याचा दुर्दैवी अंत झाल्यानं याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, मालेगाव, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होतात. या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे..अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्यानं बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्यानं बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे बिबट्यांना लपण्यासाठी ही चांगली जागा आहे. ऊसतोड करताना अनेकदा माणसावर बिबट्याचे हल्ले होत असल्याचं दिसून आलं आहे. अशात शेतकऱ्यांनी, मजुरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ऊस तोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. ज्यामुळं बिबटे, लांडगे, तरस वन प्राणी जवळ येणार नाही. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचं दिसून आलं आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाने केलंय.
हेही वाचा -