छत्रपती संभाजीनगर Sambhaji Nagar Crime News : क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून बाहेरच्या देशातून भारतात पैसे येत असल्याचे रॅकेट समोर आले आहे. तर त्याचे धागे गुजरात आणि पंजाबपर्यंत येऊन पोहचले आहेत. गरीब लोकांच्या खात्यावर हे पैसे मागवले जातात, त्याबदल्यात हजार ते दीड हजार रुपये त्यांना देऊन उर्वरित रक्कम इतर खात्यात वळवली जाते.
तीन महिन्यापासून तपास सुरू : विशेष म्हणजे हे पैसे येतात कुठून आणि जातात कोणाला हे खातेदाराला माहितीच नसते. या गुंतागुंतीच्या प्रकरणात पोलीस देखील संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळंच चौकशीत काही जणांना नोटीस देऊन सोडले तर काही जणांना ताब्यात घेतल्यानं न्यायालयाने पोलिसांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. तर केंद्रीय तपास यंत्रणा तीन महिन्यापासून तपास करत असली तरी, मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.
क्रिप्टोकरन्सी माध्यमातून होतो व्यवहार : दुसऱ्याच्या आधार आणि पॅन कार्डद्वारे बँक खाते उघडले जाते. दुसऱ्याच्या नावे घेतलेल्या सिमकार्डच्या आधारे इंटरनेट बँकींगद्वारे बेनामी व्यवहारातून मिळालेली ही रक्कम दुसऱ्याच्या नावे बँक खात्यात वळती केली जाते. नंतर ती रक्कम परस्पर काढून घेतली जाते. हा प्रकार वरवर पाहता छोटा दिसत असला तरी, संपूर्ण देशभरात याची पाळेमुळे असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे यासर्व प्रकरणांची माहिती केंद्रीय गुप्तचार यंत्रणेने पोलिसांना दिली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. गुन्ह्यात आरोपी भारतात बंदी असलेल्या डकडकगो या सर्च इंजिनचा वापर करत असल्याचं समोर आलं. आरोपी हे ट्रस्ट वॉलेट हे क्रिप्टो ट्रेडींग वापरत होते. तसेच विविध प्रोफाईल धारकांसोबत आर्थिक व्यवहारासाठी ते टेलीग्रामचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.
गोर गरिबांच्या नावानं व्यवहार : या गुन्ह्यात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शहरात काही लोक टक्केवारी देऊन नेमले आहेत. गरीब असलेल्या लोकांचा बँकेचा सिबिल स्कोर चांगला करून देण्याच्या नावावर आणि ट्रेडिंग करण्यासाठी त्यांची कागदपत्रे घेऊन बँकेची ऑनलाईन खाती उघडण्यात आली. त्यासाठी वेगळा मोबाईल क्रमांक देखील घेतला जातो. या खात्यांचे एटीएम आणि चेकबुक यांच्यासह खात्यांची माहिती नेमलेल्या लोकांकडे असते. क्रिप्टोकरन्सी माध्यमातून खात्यावर पैसे जमा झाले की, ते परस्पर काढून इतर नेमलेल्या वरिष्ठ पातळीवरील एजंटला पाठवले जातात. अशा पद्धतीने आलेले पैसे परस्पर वळवले जात होते.
आरोपींना केलं न्यायालयात हजर : अशा खात्यांची माहिती घेत पैसे वळवणाऱ्या सात जणांना गुजरातसह छत्रपती संभाजीनगर शहर, बिडकिन येथून अटक करण्यात आली आहे. तर याची पाळेमुळे दिल्ली, पंजाबपर्यंत जाऊन पोहचली आहेत. क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील अटक सर्व आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यात आरोपी उत्सवकुमार भेसानिया, ऋषीकेश भागवत, अनुराग घोडके, ज्ञानेश्वर पठाडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे तर, आरोपी हर्षल काछडीया, निशांत कालरिया आणि जैमिक सालिया यांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ए. डी. बोस यांनी दिले. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी काम पाहिलं.
व्यवहार कोट्यवधींचे, माहिती दहा लाखांची : क्रिप्टोकरंन्सीच्या माध्यमातून होत असलेल्या या गैरव्यवहाराची व्याप्ती खूप मोठी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली. मात्र, दुसरीकडं कोट्यवधींचे व्यवहार देशभरात होत असताना पोलिसांच्या हाती मात्र दहा लाखांची माहिती लागली आहे. त्यामुळं पोलीस तपास संथ गतीने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. खातेदार किती? यांची खाती कोणी उघडली? कोणत्या बँकांमध्ये उघडली? आलेले पैसे कोणते एजंट काढतात? कोणाला पाठवतात अशा अनेक प्रश्नांची माहिती अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
पोलिसांवर ताशेरे : पोलिसांनी अनेक लोकांना चौकशीसाठी बोलावले, मात्र त्यात काही जणांना चौकशी करून सोडले, तर काहींना ताब्यात घेतले. या तपासामुळं न्यायालयाने देखील पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. ज्या लोकांना नोटीस देऊन सोडले त्यांना लावलेली कलमं आणि अटक करण्यात आलेल्या लोकांना लावण्यात आलेली कलमं जर सारखी आहेत, तर वेगवेगळा न्याय कसा? असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. तर या प्रकरणाचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तीन महिन्यांपासून तपास करत आहेत. याचा सुत्रधार दिल्लीत असल्याची माहिती मिळाली असली तरी, तपास यंत्रणा त्याच्यापर्यंत अद्याप पोहचली नाही.
पैसे कशाचे : क्रिप्टोकरंन्सीच्या माध्यमातून येणारे पैसे नेमके कशाचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परदेशात असलेला काळा पैसा देशात आणण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दहशतवादी कामात वापरण्यात येणारा पैसा चोरट्या पद्धतीने देशात आणला जाऊ शकतो, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. तर हवालाच्या माध्यमातून देखील हा व्यवहार होत आहे का? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क केला असता अद्याप तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा -