पालघर : जिल्ह्यातील केळवा येथे शितलादेवीचं प्रसिद्ध मंदिर असून, ही देवी सोमवंशी तसंच अन्य कुटुंबीयांची कुलस्वामिनी आहे. या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पालघर, ठाण्यासह अन्य जिल्ह्यातून भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. विजयादशमीपर्यंत भाविकांच्या गर्दीचा ओघ असाच सुरू राहणार आहे.
कसं आहे देवीचं रुप? : शितलादेवी ही हिंदू धर्मातील एक देवता असून, या देवीला आई भगवतीचं रूप म्हणून ओळखलं जातं. भारतात या देवीची २२ मंदिरं असून, ठिकठिकाणी तिची पूजा केली जाते. तिला १०८ नावं आहेत. स्कंध पुराण व अन्य धार्मिक ग्रंथातही शितलादेवीचा उल्लेख आढळतो. स्कंध पुराणानुसार, जेव्हा देवतांनी भगवतीच्या आराधनेसाठी अग्निप्रज्वलित केला, तेव्हा त्यातून शितलादेवी प्रकट झाली, अशी आख्यायिका आहे. या देवीचं वाहन गाढव असून, एका हातात चांदीचा झाडू आणि दुसऱ्या हातात शितल जल असलेलं भांडे आहे. या देवीचं कपाळही भव्य आहे.
"केळवा येथील शितलादेवी जागृत देवस्थान असून या देवीचे भक्त कोकण आणि मुंबई परिसरात जास्त आहेत. भक्तांसाठी देवस्थान सर्व सुविधा पुरवत आहेत. ही साथीचे रोग निवारण करणारी देवी असल्यामुळे या देवीला साथीचे रोग असलेल्या काळात भेट देणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते." - ॲड. हेमप्रकाश तरडे, माजी अध्यक्ष, मंदिर समिती
दृष्टांतानंतर शेतकऱ्याला मंदिर : केळवा येथील शितलादेवीबाबत सांगितलं जातं की, देवीचा निश्चित ठावठिकाणा माहीत नसतानाही या भागात ती वावरत होती. शितलादेवी देवस्थानच्या समोरच्या बाजूस बगलवाडी नावाची बागायती वाडी आहे. या परिसरात देवीचा गुप्त स्वरूपात वास होता, असं सांगितलं जातं. देवीनं एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर गोपाळ पंथीय समाजानं देवीचा शोध घेतला आणि केळवा येथे सध्याच्या जागी देवीचे मंदिर बांधले. त्यानंतर १७ व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा उद्धार केला. १९८१ पर्यंत मंदिराचे व्यवस्थापन एकच विश्वस्त पाहत होते. नंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था केली. त्यानंतर १९८६ मध्ये सध्याच्या मंदिराची निर्मिती झाली.
साथीचे रोग होतात बरे : विशेष म्हणजे, या देवीच्या जवळच वाळकेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. तेथे रामकुंडही आहे. त्यामुळे गोवर, कांजण्या व ताप असणाऱ्या मुलांना किंवा अन्य लोकांना या मंदिरात आणलं जातं. तिथं त्यांच्यावर लिंबाच्या पाल्यानं अगोदर उपचार करून नंतर रामकुंडात स्नान केलं की त्वचा विकार बरे होतात, असं सांगितलं जातं. या ठिकाणी रामकुंडात आंघोळीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टनं तेथे आडोसा उभा केला आहे.
"प्रभू श्रीरामांनी बाण मारून या रामकुंडाची निर्मिती केल्याचं सांगितलं जातं. या रामकुंडात शेवाळ असून हे शेवाळ ऑक्सिजन निर्मिती मोठ्या प्रमाणात करतं आणि पाण्याचं शुद्धीकरण करतं, असं एका संशोधनात आढळलं आहे. या पाण्यात आंघोळ केल्यास साथ रोग नियंत्रणात येतात." - हितेंद्र भालचंद्र राऊत, अध्यक्ष, शितलादेवी मंदिर समिती
वर्षभरात तीन उत्सव : शितलादेवीच्या मंदिरात वर्षभरात तीन वेळा उत्सव होतात. चैत्र पौर्णिमेचा उत्सव तीन दिवस चालतो, तर त्रिपुरी पौर्णिमेला येथे दीपोत्सव होतो. त्यात सुमारे पाच हजार लोक सहभागी होतात. याशिवाय घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत मंदिरात उत्सव आणि यात्रा असते. माजी महसूल मंत्री भाऊसाहेब वर्तक यांची या देवीवर मोठी श्रद्धा होती. त्यांचे ते कुलदैवत होते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमीला शितला सप्तमी साजरी केली जाते. या दिवशी माता शितलादेवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला शिळे अन्न नैवेद्य म्हणून दिले जाते. या सणाला ‘बासुदा’ असे म्हणतात. शितलादेवी 'आरोग्याची देवी' म्हणून ओळखली जाते.
बळी द्यायच्या प्रथेचा बळी! : या देवीच्या समोर असलेल्या कुंडात पूर्वी बकऱ्यांचा व कोंबड्यांचा बळी देऊन त्याचा प्रसाद साऱ्या गावभर ढोल, ताशे बडवीत आणि देवीचा जयजयकार करीत वाटला जाई; परंतु ही प्रथा १९६५ पासून गावातील नागरिकांनी बंद केली. तेव्हापासून या दिवशी कोहळ्याचा बळी देऊन उत्सवाची सांगता केली जाते. नवरात्र उत्सवाच्या काळात शितलादेवी पुढे समोर सुंदर आरास केली जाते. झेंडूच्या दोन माळा दोन दिशेने एक एक अशा प्रमाणे नऊ रात्री देवीसमोर १८ माळा टांगून आरास केली जाते. पाचव्या दिवशी विविध वस्त्र नेसवून, आभूषणे देवीच्या गळ्यात घालून देवीची आद्य पूजा केली जाते. सहाव्या रात्री हातात दिवे घेऊन भक्त देवीसमोर नाचतो व देवीला जागे करतो. सातव्या दिवशी बेल, पिंपळ, तुळस आदींसह नव पवित्र झाडाच्या फांद्या घेऊन त्याच्याभोवती फुलांची विविध प्रकारची आरास केली जाते. दहाव्या दिवशी देवी गावाबाहेर निघते, असा विश्वास आहे.
आख्यायिका : नवरात्रीच्या उत्सवात देवी देवतांवरबरोबर युद्धात गुंतलेली असल्यामुळे देवीला आंघोळ न घालता तिचे पाय धुतले जातात. विजयादशमीला मात्र देवीला आंघोळ घालतात. कारण ती दैत्याला मारून शांत झालेली असते, अशी आख्यायिका आहे.
हेही वाचा -
- कोराडीची जगदंबा माता: दिव्य, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेली आदिमाया जगदंबा; जाणून घ्या काय आहे आख्यायिका - Koradi Navratri Festival 2024
- नवरात्रीमध्ये दुर्गामातेसाठी खास नऊ भोग - Navratri 2024 Bhog for Each Day
- पांडवांनी सातपुडा पर्वतात स्थापन केली देवी; आदिवासींची देवी अशी आहे ओळख - Navratri Festival 2024