मुंबई Crime News : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये हत्या करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जौनपूर जिल्ह्यातील डॉक्टर तिलक हरी पटेल यांची क्लिनिक मध्ये झोपलेले असताना तीन आरोपींनी हत्या केली होती. ही घटना चार जानेवारीला घडली होती. त्यानंतर आरोपी फरार झाले होते.
आरोपीला ठोकल्या बेड्या : या हत्याकांडातील एक आरोपी वांद्रे परिसरात आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष नऊ ने बेकायदेशीर रित्या बाळगलेल्या शस्त्रांसह 22 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश कुमार संग्राम यादव (वय 22) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी मंगेश कुमार यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारा असून तो सध्या गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सापडून आली आहेत. ही सर्व शस्त्रं जप्त करून आरोपीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात कलम 3, 25 शस्त्र अधिनियम सह कलम 37 (1) (अ) 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास कक्ष-9 करीत आहे.
अटक आरोपीवर अनेक गुन्हे दाखल : अधिक चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपीने उत्तर प्रदेशातील जलालपुर येथे एका डॉक्टरची हत्या करून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. या बाबत जलालपुर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 302 अन्वये गुन्हा दाखल असून तो या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचं कळालं. अटक आरोपी विरोधात उत्तर प्रदेश येथील विविध पोलीस ठाण्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारहाण करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, दंगल घडवुन आणणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसंच अटक आरोपीस न्यायालयासमोर रिमांडकरिता हजर करण्यात आलं असून उत्तर प्रदेशातील जलालपुर पोलिसांनी आरोपीचा ताबा घेण्याकरिता कळविण्यात आलं आहे.
हेही वाचा -