नागपूर Heat Wave : वाढत्या तापमानमुळं वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून नागपुरातील महावितरण विभागानं पॉवर सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मरला चारही बाजूनं कुलर लावले आहेत. विजेची मागणी ही दुपटीनं वाढलीय. त्यामुळंच वीजेचं वितरण करणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण वाढलेला आहे. ऐनवेळी ट्रान्सफॉर्मर हिट होऊन विजेची लाईन ट्रिप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भीषण गर्मीत वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांच्या संतापचा उद्रेक होऊ नये यासाठी ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी चारही बाजूंनी कुलरचा गारवा दिला जातोय. एकीकडं भीषण उन्हाळ्यामुळं नागपूर शहरामध्ये सजीव लोकं दगावत असताना आता निर्जीव ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी कुलरची हवा द्यावी लागते आहे. लोकं जगवण्यासाठी हे देखील तितकंच महत्वाचं झालंय, हे सत्य नाकारता येणार नाही.
विदर्भात सकाळी 7 वाजताच होते दुपार : गेल्या महिन्याभरापासून नागपुरसह विदर्भावर सूर्य जणू कोपलाय अशीचं परिस्थिती निर्माण झालीय. सकाळी 7 वाजल्यापासून सूर्याची दाहकता जाणवायला सुरुवात होते. त्यामुळंच विदर्भातील सकाळ देखील नकोनकोशी वाटायला लागलीय. दिवसभरातील परिस्थिती तर विचारायची सोय नाही. तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या खाली येण्यास तयार नसल्यानं नागपुरातील रस्ते अक्षरशः निर्मनुष्य होऊन जातात. त्यात नवतपा सुरु असल्यानं रात्री देखील गरम हवा वाहत आहेत. त्यामुळं परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे.
म्हणून लावावे लागले कुलर : रोजच्या रोज तापमान वाढत असल्यानं विजेची मागणी देखील दुप्पटीनं वाढलीय. त्यामुळं वीज वितरण यंत्रणेवर प्रचंड ताण वाढलाय. परिस्थिती तर अशी झाली की एक मिनिट वीज पुरवठा खंडित झाला तरीही नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ट्रान्सफॉर्मरला चारही बाजूनं कुलर लावले आहे. गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झालीय. त्यामुळं रस्त्यावरील वर्दळही कमी झालीय. रस्तेही ओस पडल्याची परिस्थिती निर्माण झालीय. एरवी गर्दीनं फुललेले रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
विदर्भात नवतपा म्हणणे तापमानाचा उद्रेक : आज नवतपाचा तिसरा दिवस होता. नवतापात विदर्भाची परिस्थिती अत्यंत कठीण होत असते त्याचाचं प्रत्यय आज आलाय. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण 9 दिवस. या दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावरती पारा जरी कमी दिसत असला तरी तापमान हे मात्र जास्त असते. उत्तरेकडील राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो. नवतपा याला हवामानशास्त्रात कोणतेच स्थान नाही, म्हणजेच असा काही प्रकार मानला जात नाही. पण या नऊ दिवसांमध्ये सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळं तापमानात वाढ होत असते, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय.
या काळात असतो नवतपा : दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवतपाला सुरुवात होते. नवतपाच्या काळात पृथ्वीवरील उष्णता ही प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतो. सूर्य ज्यावेळी पंधरा दिवसांकरिता रोहिणी नक्षत्रात येतो, त्यातील सुरुवातीच्या 9 दिवसाला नवतपा, असं म्हटलं जातं. पावसाळ्याची दशा आणि दिशा कशी राहील हे ठरवण्यासाठी नवतपाच्या 9 दिवसांना फार महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये थंड वारे वाहत नसल्यास मान्सूनमध्ये पाऊस चांगला होईल. तसंच या दिवसात पाऊस आला तर मान्सूनचा प्रवास अडथळ्यांचा असतो असं म्हटलं जातं.
हेही वाचा :