मुंबई Teachers Constituency Election : लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच महायुतीमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. याला निमित्त आहे, ते विधान परिषद निवडणुकीचं. विधान परिषदेच्या दोन पदवीधर तसंच दोन शिक्षक अशा चार मतदार संघासाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. यासाठी महायुतीच्या जवळपास सर्वच घटक पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केलीय. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात लढाई : मुंबई शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदार संघ अशा चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. उमेदवारीवरून महायुतीच्या घटक पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई शिक्षक मतदार संघातून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केली आहे. ही उमेदवारी घोषित करताना त्यांनीही भाजपाला विचारात घेतलं नाहीय. मुंबई शिक्षक मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातोय. मागील 18 वर्षे या मतदारसंघातून शिक्षक भारतीचे कपिल पाटील प्रतिनिधित्व करत आहेत. तर, यंदा त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपा उमेदवाराचा विजयचा दावा : तसंच शिवसेना ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेश कार्यकारणीचे निमंत्रित सदस्य तथा शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी लढवण्याचं ठरलंय. 'कुठल्याही परिस्थितीमध्ये 'मी' या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून माझा विजय निश्चित आहे', असा ठाम विश्वास अनिल बोरनारे यांनी यांनी व्यक्त केलाय. आता यावरून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिक्षक भारती, उबाठा गट यांच्यात रंगतदार लढत होणार आहे.
मनसेचे फासे पलटले : दुसरीकडे कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळं त्यांच्याच नावाची चर्चा आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपा महायुतीच्या इतर घटक पक्षाशी कुठलीही चर्चा न करता अभिजीत पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपाची कोंडी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी केवळ मोदी यांच्याकडं बघून महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याअगोदरच आपले फासे उलटे टाकले आहेत. यावर बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष नेते आमदार आशिष शेलार म्हणाले, कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ आहे. निरंजन डावखरे येथून विद्यमान आमदार आहेत. कुठल्याही परिस्थितीत भाजपा ही निवडणूक लढणार असून त्यांनी मनसेलासुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेले सर्व महायुतीचे घटक पक्ष विधान परिषद निवडणुकीत एकमेकांविरुद्ध स्वतः स्वतःची ताकद आजमावयला तयार झाले आहेत.
मुंबई पदवीधर मतदार संघातही चुरस : मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अनिल परब यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केला आहे. तसंच भाजपासुद्धा या जागेवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटसुद्धा इथं उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळं विधान परिषदेच्या चारही जागांवर सर्वच पक्ष आपापले दावे ठोकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये समजूतदारपणे यामध्ये माघार घेतली जाते, की सर्वच निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकतात हे पाहणं गरजेचं आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघावर भाजपचाच अधिकार : मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढण्यावर ठाम असलेले भाजपा शिक्षक नेते, अनिल बोरनारे म्हणाले, 'शिक्षण क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेले असे अनेक जण आज निवडणुकीच्या शर्यतीमध्ये आहेत. परंतु यावर खरा अधिकार भारतीय जनता पक्षाचाच आहे. करण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मागील 20 वर्षांमध्ये शिक्षकांच्या हक्कासाठी अनेक आंदोलन झाली. तुटपुंजा पगारावर काम करणारे विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन भेटत नव्हतं, तेव्हा कायम विना अनुदानित शब्द काढण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलं. तसंच महायुतीच्या सरकारनं 61 हजार शिक्षकांना 1160 कोटी दिले. महायुती सरकारमुळं हे सर्व शक्य झालं. कारण शिक्षकांच्या आंदोलनासाठी आम्ही संपूर्ण राज्य पिंजून काढलं. मागील 20 वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रत्येक गोष्टींचा पाठपुरावा करतोय. म्हणून अनेक गोष्टी मार्गी लागल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघावर भाजपाचाच दावा आहे. आम्ही फक्त निवडणूक जिंकणार नाही, तर मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार', असा ठाम विश्वास अनिल बोरनारे यांनी व्यक्त केला आहे.
हे वाचलंत का :