पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अशातच सोलापूरमधील माळशिरसमधील मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. याच मारकडवाडी येथील माती काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आली असून, ती दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना तसेच महात्मा गांधी यांच्या स्मारकाला अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली. पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
मारकडवाडीची माती राहुल गांधींना देणार : "मारकडवाडी येथील लोकांनी जो निर्णय घेतला आहे, तो ऐतिहासिक निर्णय असून या ठिकाणची माती आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देणार आहोत. तसंच येथील नागरिकांनी आम्हाला विनंती देखील केली आहे की, ईव्हीएम विरोधातील लढा राहुल गांधी यांनी आमच्या येथून करावा. तसंच मारकडवाडी येथे जो काही प्रकार घडला, याबाबत देखील आम्ही माहिती ही राहुल गांधी यांना देणार आहोत," असं यावेळी अतुल लोंढे यांनी सांगितलं.
ईव्हीएमविरोधात आवाज उठवणार : "ज्या पद्धतीनं 'भारत जोडो यात्रा' काढण्यात आली, त्याच पद्धतीनं ईव्हीएमविरोधात आवाज आम्ही उठवणार आहोत. आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक पाहिजे. आमचा ईव्हीएमला विरोध आहे," असं म्हणत अतुल लोंढे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.
विरोधक आक्रमक : विधानसभा निकालानंतर ईव्हीएमबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा निकाल हा ईव्हीएम हॅक करुन लागला असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, हा आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावला.
हेही वाचा -