अमरावती Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भीतीनं काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवलं आहे, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते शनिवारी (20 जानेवारी) अमरावतीत जाहीर सभेत बोलत होते. महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्यास 'वंचित' लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवेल, असंही आंबेडकरांनी म्हटलंय.
काँग्रेसला बळीचा बकरा हवा : अमरावतीमध्ये सायन्स कोअर मैदानावर झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासह काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केलाय. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन दोन वर्षे उलटली, तरी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचं धोरण ठरलेलं नाही. महाविकास आघाडीला मोदींचा पराभव करायचा आहे का? काँग्रेसनं वंचित आघाडीला लोकसभेच्या दोन जागा देण्याची तयारी दाखवली असली, तरी कोणत्या जागा देणार हे सांगायला तयार नाही. आघाडी तोडण्यासाठी काँग्रेसला बळीचा बकरा हवा आहे. मात्र, आमची तशी इच्छा नाही.'
...अन्यथा तुरुंगात जाल : वंचित बहुजन आघाडीची सर्व 48 जागा लढवण्याची तयारी आहे. कारण आमच्यापैकी कोणीही तुरुंगात जाणार नाही. पण मोदी पुन्हा सत्तेत आले, तर भविष्यात सोनिया गांधींपासून सगळे नेते तुरुंगात जाऊ शकतात. त्यामुळं आमच्याशी आघाडी केली तरच तुम्ही वाचाल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिलाय.
आमच्याशी चर्चा करा : शनिवारी दुपारी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ, असं सांगितल्याचं मी ऐकलं. आम्हाला खरंच महाविकास आघाडीत घ्यायचं असेल, तर असं पत्रकारांशी बोलून काय अर्थ आहे? त्यांनी थेट आमच्यासोबत चर्चा करायला हवी, असं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजपाला हवा देशात एक कलमी कार्यक्रम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अकोल्याला आले होते. त्यावेळी आम्ही एक निवेदन देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, निवेदन वगैरे घेण्याची पद्धत आमच्यात नाही, असा निरोप त्यांच्याकडून देण्यात आला. खरंतर हा त्यांचा हिटलरपणा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाला हुकूमशाही हवी आहे. या देशात भाजपाला एक कलमी कार्यक्रम राबवायचा आहे, असा आरोप देखील त्यांनी केलाय.
राजकीय पक्ष वाचणे काळाची गरज : भाजपाला या देशात कुठलाही दुसरा पक्ष नकोय. मात्र, राजकीय पक्ष वाचणे ही काळाची खऱ्या अर्थानं गरज आहे. या देशात राजकीय पक्ष वाचला, तर या देशाची लोकशाही वाचेल. राजकीय पक्ष वाचले नाही, तर लोकशाही संपेल. लोकशाही संपली, तर या ठिकाणी हुकूमशाहीला सुरुवात होईल, अशी भीती देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
एकत्र काम करण्याची गरज : मोदींना हरवायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकत्र बसून काम करण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडी भाजपाला टक्कर देऊ शकत नाही. आपली सर्व एकत्रित शक्ती निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकेल. आघाडी न केल्यास अनेकांची जेलवारी निश्चित असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोणाच्या नादी लागायचं जनतेने ठरवावे : नेमकं काय खरं, काय खोटं याचं भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. भाजपाला या देशात अध्यक्षीय पद्धती आणायची आहे. नरेंद्र मोदी यांच्याबाबत तेली समाजाला निश्चितच गौरव वाटतो. भविष्यात या देशात अध्यक्षीय प्रणाली आली, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तेली समाजाचा उमेदवार देणार नाही. भविष्यात तेली, माळी, कुणबी, लोहार, कुंभार अशा कुठल्याच जातीच्या व्यक्तीला राजकारणात महत्त्व दिलं जाणार नाही, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
हे वाचलंत का :