मुंबई Ashok Chavan Resigned : काँग्रेसला मोठा धक्का बसणारी बातमी समोर आलीय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आज सकाळी 11.24 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. 'ईटीव्ही भारत'च्या हाती अशोक चव्हाणांचं राजीनामा पत्र लागलं आहे.
भाजपाकडून राज्यसभेवर जाऊ शकतात : अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं सुपुर्द केलाय. ते भाजपाकडून राज्यसभेवर जाऊ शकतात, असं बोललं जातंय. तसेच त्यांच्यासोबत 10 ते 12 आमदारही पक्ष बदलू शकतात. महाराष्ट्र काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते, बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य : अशोक चव्हाण यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी मीडियाकडून अशोक चव्हाण यांच्याबद्दल ऐकलं. पण सध्या मी एवढेच सांगू शकतो की काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. जनतेशी जोडलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट झाल्याचं जाणवत आहे. मला खात्री आहे की काँग्रेसमधील काही मोठे चेहरे भाजपात सामील होतील."
वडिलांकडून वारसा मिळाला : डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण राज्यातील सर्वात प्रभावशाली काँग्रेस नेत्यांपैकी एक मानले जातात. ते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदासह पक्षात त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. मोदी लाट असूनही त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसला नांदेडमधून विजय मिळवून दिला होता. दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वडील शंकरराव चव्हाण यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला. शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच मराठवाड्यात काँग्रेस मजबूत झाली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते : अशोक चव्हाण हे 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत दीड वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आदर्श इमारत घोटाळ्यात त्यांचं नाव पुढे आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यांनी पुनरागमन केलं आणि 2014 ची लोकसभा निवडणूक जिंकली. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत.
हे वाचलंत का :