पुणे : विधानसभा निवडणूक 2024 च्या महासंग्रामाला सुरुवात झाली असून काँग्रेस पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पुण्यातील कसबा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या माजी महापौर कमल व्यवहारे नाराज झाल्या असून त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानं काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. मात्र माजी महापौर कमल व्यवहारे या कोणत्या पक्षात जाणार आहेत, याबाबत विचारलं असता, त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
आमदार रवींद्र धंगेकरांना तिकीट : पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना गुरुवारी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या माजी महापौर कमल व्यवहारे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी आज सकाळी त्यांच्या काँग्रेसच्या विविध पदांचा राजीनामा देत "मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून लढणार," असं सांगितलं आहे.
पहिल्या महापौर म्हणून कमल व्यवहारेंची ओळख : माजी महापौर कमल व्यवहारे या गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबत कार्यरत असून नगरसेवक ते महापालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कसबा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. सातत्यानं त्यांना डावललं जात असल्यानं आज त्यांनी कठोर भूमिका घेत "मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असून विधानसभा निवडणुकीत मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे," असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेही वाचा :