मुंबई Ladki Bahin Ladka Bhau Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा केली आहे. यानंतर पंढरपूर इथं मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीबरोबर 'लाडका भाऊ' ही योजनाही जाहीर केली आहे. या दोन्ही योजनांना राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच या दोन्ही योजनांची सर्वत्र चर्चा आहे. मात्र राज्य सरकारनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेचा अर्ज कसा व कुठे दाखल करायचा? या योजनांचे नियम आणि अटी काय आहेत? याचा अर्ज ऑनलाइन की ऑफलाईन दाखल करायचा? यशस्वीरित्या अर्ज दाखल झाला आहे की नाही? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. तसंच अजूनही गाव-खेड्यातील लोकांना या दोन्ही योजनांच्या नियम व अटी माहीत नाहीत. अद्यापही संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ' या दोन्ही योजनांच्या नेमक्या अटी काय आहेत. हे आपण पाहू या.
काय आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटी :
- कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावं.
- जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड चालू शकतं. यो दोन्हीमुळे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता (इनक्म टॅक्स) म्हणजे वार्षिक उत्पन्न कर भरणारा नसावा.
- अर्जदार स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारा नसावा.
- अर्जदार शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा रु 1,500/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा.
- कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरशन/बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/ संचालक/सदस्य नसावा.
- अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नसावं.
- एका कुटुंबात जास्तीत जास्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापेक्षा अधिक महिलांना लाभ घेता येणार नाही.
कसा दाखल करणार अर्ज :
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरु शकता. अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिथं शासनाचं सेवा केंद्र आहे या ठिकाणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज दाखल करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज दाखल करायचा असल्यास गुगल किंवा प्ले स्टोरमधून 'नारी शक्ती दूत' हे अप्लिकेशन डाऊनलोड करुन या अप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज दाखल करता येऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रं कोणती ?
1) आधार कार्ड (जे बँकेशी संलग्न असावं)
2) केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा उत्पनाचा दाखला
3) जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
4) बँक पासबुक
5) हमीपत्र
6) पासपोर्ट साईज फोटो
काय आहे 'लाडका भाऊ' योजना : राज्यातील बारावी पास झालेल्या तरुणांना प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये, पदविका मिळवलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये मिळणार आहे. या योजनेमुळं राज्यातील तरुणांना 1 वर्ष काम करण्याची संधी मिळणार असून त्यांच्या खात्यात शैक्षणिक पात्रतेनुसार पैसे जमा होणार आहेत. या तरुणांना वर्षभरासाठी कोणत्याही व्यवसायात अथवा कारखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणजेच अप्रेंटीशीप करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी त्याला मिळालेल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर तो अन्य ठिकाणी नोकरी करु शकेल त्याचं कौशल्य वाढू शकेल.
या योजनेच्या नियम आणि अटी काय :
- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 12 वी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/ असावी.
- उमेदवाराचं वय 18 ते 35 असावं.
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- उमेदवाराचं आधार नोंदणीकृत असावं.
- उमेदवाराचं बँक खातं आधार नंबरशी संलग्न असावं
- उमेदवारानं कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि शवभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
- उमेदवारानं संकेत स्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रं कोणती ?
1) आधार कार्ड (जे बँकेशी संलग्न असावं)
2) अधिवास प्रमाणपत्र
3) ड्रायव्हिंग लायसन्स
4) जन्म दाखला किंवा वयाचा दाखला
5) शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
6) बँक पासबुक
7) पासपोर्ट साईज फोटो
हेही वाचा :