मुंबई Maharashtrian Students Stuck In Bangladesh : बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता महत्वाची पावलं उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणं आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिलीय.
परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद : बांगलादेशातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तातडीनं कृती करण्याची गरज असून तेथील प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य असलेली मदत देण्यात यावी, तसंच त्यांची तत्काळ सुरक्षितता निश्चित करावी आणि त्यांना शक्य तितक्या लवकर भारतात सुरक्षित परतण्याची प्रक्रिया जलदगतीनं करावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलय. त्यांच्या मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तसंच या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
संपर्कासाठी पथक स्थापन : बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळावी. तसंच त्यांना तातडीनं मदत उपलब्ध करून देता यावी. या अनुषंगानं बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांशी त्वरित संपर्क साधण्यासाठी, विद्यार्थ्यांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयानं काम करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तर बांगलादेशात अडकेलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून योग्य ती मदत आणि सहकार्य केलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलय.
हेही वाचा-
- “शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा घालून...”: बांगलादेशमधील परिस्थितीबाबत संजय राऊतांचं विधान, केंद्राला दिला इशारा - Sanjay Raut on Bangladesh Protest
- भारत-बांगलादेश सीमा भागात 'बीएसएफ' हाय अलर्ट; विमान उड्डाणं रद्द - Bangladesh Protest BSF High Alert
- बांगलादेशमध्ये संपूर्ण देशात उसळला हिंसाचार, शेख हसीनांच्या 'त्या' निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप - BANGLADESH PROTEST 2024