सातारा Satara Crime News : मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो, असं सांगून हॉटेल व्यावसायिकाची 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीआयडीच्या (गुन्हे अन्वेषण विभाग) पुणे विभागातील अतिरिक्त पोलीस अधीक्षकास महाबळेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापुरे, असं त्याचं नाव असून न्यायालयानं त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
मद्य दुकानाच्या परवान्यासाठी घेतले पैसे : मद्य दुकानाचा परवाना मिळवून देण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार असल्याचं सांगून श्रीकांत कोल्हापुरे आणि त्यांच्या साथीदारांनी महाबळेश्वरमधील हॉटेल मेघदूतच्या मालकाकडून रोख आणि चेकद्वारे 1 कोटी 5 लाख रुपये घेतले होते. मात्र, फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हॉटेल मालकानं गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडं यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं तपास करून 9 जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
संशयितास ठाणे येथून घेतलं ताब्यात : यापूर्वी फसवणुकीच्या गुन्ह्यात हणमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे आणि बाळू बाबासाहेब पुरी यांना अटक झालेली आहे. रविवारी (8 ऑगस्ट) अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांना ठाणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळं पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक वर्षा कावडे, पोलीस अंमलदार विजय कुंभार, निवृत्ती पाडेकर, जमीर मुल्ला आणि स्वप्नील जाधव यांनी ही कारवाई केली. कोल्हापुरे यांना वाई न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -