मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेनेही उमेदवार उभे केलेत. अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरून महायुतीत संघर्षाची परिस्थिती निर्माण झालीय. भाजपा नेते आशिष शेलार यांच्या माध्यमातून भाजपाने शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला असून, भाजपा नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या कोट्यातून आमदार करावे, असे ठणकावून सांगितलंय.
उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव: निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत माहीमच्या जागेवर महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन राज ठाकरेंनी केल्याची चर्चा होती. इतक्या बैठका अन् चर्चा होऊनदेखील माहीम विधानसभेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलीय.
अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत चर्चा- फडणवीस: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्या नावाची घोषणा केलीय आणि सोबत त्यांना उमेदवारी अर्जदेखील दिलाय. त्यानंतरच आमदार सदा सरवणकर यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये, यासाठी भाजपाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला जात असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री आमदार सदा सरवणकर यांना वर्षा बंगल्यावर बोलावले होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांशी बोलून उमेदवारी अर्ज मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा केल्याचं बोललं जातंय.
मी तडजोड करणार नाही- सरवणकर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रविवारी झालेल्या बैठकीत आमदार सदा सरवणकर यांनी माहीम-दादर मतदारसंघातून आपण अनेकदा विजयी झालो आहोत, त्यामुळे आपण तडजोड करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सदा सरवणकर यांनी 'भाजपाला अमित ठाकरेंबद्दल काळजी वाटत असेल तर त्यांना त्यांच्या कोट्यातून विधान परिषदेत अमित ठाकरेंना जागा द्यावी. मी माझा निर्णय बदलणार नाही. भाजपा नेत्यांनी दबाव आणू नये, अशा सूचनादेखील केल्याची माहिती मिळत आहे.
दिवसातून एकदा तरी मी वर्षा बंगल्यावर जातो: यासंदर्भात आम्ही आमदार सदा सरवणकर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, "दिवसातून एकदा तरी मी वर्षा बंगल्यावर जात असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आहे. पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे. निवडणुकीचे साहित्य प्रचाराचे साहित्य आलेलं आहे. तुम्ही सध्या ज्या बातम्या चालवत आहात, तशा पद्धतीचे मला कोणीही सांगितलेलं नाही. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेणे हा भागच येत नाही. मी उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. आम्ही उद्यापासून कामाला सुरुवात करतोय," असंही सदा सरवणकर म्हणालेत.
हेही वाचा :