मुंबई EVM Machine Theft Case : पुणे जिल्ह्यातील सासवड येथे तहसीलदार कार्यालयाशेजारी असलेल्या कोषागार विभागाच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन चोरीला गेल्या होत्या. अशाप्रकारे ईव्हीएम मशीन चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी याची गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तातडीनं कारवाई करत ईव्हीएम मशीन चोरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कंट्रोल युनिट ताब्यात घेतले असल्याची माहितीसुद्धा देशपांडेंनी दिली.
डेमो मशीन चोरीला: या दोन चोरांनी चोरी केलेली ईव्हीएम मशीन ही प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ठेवण्यात येणारी मशीन आहे. निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन या जिल्हा मुख्यालयाच्या गोदामामध्ये सुरक्षित असल्याचा दावाही देशपांडे यांनी केलाय. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांकडून कंट्रोल पॅनल जप्त केलं गेलं. त्यांनी केवळ चोरीच्या उद्देशानं हे कृत्य केल्याचं सांगितलं. संबंधितांचे काही वेगळे संदर्भ आहेत का? कोणाशी काही संबंध आहे का? हे तपासले जात आहे; मात्र अशा पद्धतीची ही राज्यातील पहिलीच घटना असून यापुढे सर्व प्रकारची सतर्कता बाळगली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी दिली.
जनजागृती मोहीम सुरूच: निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली जनजागृती मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे. जनतेपर्यंत ईव्हीएम मशीन बाबत योग्य माहिती देण्यात येईल. जनतेला दाखवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन आणि प्रत्यक्ष निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन या वेगळ्या ठेवल्या जातात, असंही श्रीकांत देशपांडे म्हणाले. ईव्हीएम मशीन कुठल्याही पद्धतीनं हॅक होत नाहीत अथवा त्याच्यामध्ये छेडछाड करता येत नाही. तसेच जर कागदी मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याविषयी विविध राजकीय पक्षांची मतं असतील तर त्यांनी ती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवावी, हा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे त्या संदर्भात आपण कोणतही भाष्य करणार नाही, असंही ते म्हणाले.
हेही वाचा: