मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यातील दोन महत्त्वाचे राजे उतरले असून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत, तर साताऱ्यामधून भाजपाच्या चिन्हावर छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. छत्रपती शाहू महाराज पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत असून उदयनराजे भोसले यांची ही चौथी निवडणूक आहे. यापूर्वी ते दोनदा खासदार झाले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या दोन्ही राजांनी निवडणूक आयोगाकडं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीचं दिलेलं विवरण सर्वसामान्य माणसाचे डोळे दिपवणारं आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांची संपत्ती : भारतीय जनता पार्टीकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांची एकून संपत्ती दिली आहे. ही जंगम मालमत्ता 16 कोटी 85 लाख 77 हजार रुपये इतकी आहे. त्यांच्या पत्नी दमयंतीराजे यांच्याकडं एक कोटी 29 लाख 97 हजार रुपये आहेत. यापैकी उदयनराजे यांच्याकडं सोने, चांदी असे एकूण 2 कोटी 60 लाख 74 हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी दमयंतीराजे यांच्याकडं 35 लाख 64 हजार दागदागिने आहेत. त्यांच्या घरात अन्य जडजवाही 44 लाख 35 हजार रुपयांचे आहे, तर त्यांच्या कन्या नयनतारा यांच्याकडे पाच लाख 29 हजार रुपयांचे जडजवाहीर आहेत.
उदयनराजेंवर चार गुन्हे दाखल : उदयनराजे यांचे गतवर्षातील वार्षिक उत्पन्न एक कोटी 11 लाख 50 हजार 760 रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीचं उत्पन्न 20 लाख 67 हजार 724 दर्शविण्यात आलं आहे. सातारा शहर परिसरात त्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्ता अनेक आहेत. यांची एकूण किंमत 172 कोटी 94 लाख 49 हजार रुपये आहे. तसंच त्यांच्या पत्नीच्या नावे तीन कोटी 79 लाख 37 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. कुटुंबाची स्थावर मालमत्ता 28 कोटी 79 लाख 48 हजार रुपये इतकी आहे. तर उदयनराजे यांच्यावर दोन कोटी 44 लाख 63 हजार रुपयांचं कर्ज आहे. त्यांनी आपला कोणताही व्यवसाय अथवा नोकरी दाखवलेली नाही. उत्पन्नाचे स्त्रोत शेती व्याजाचं उत्पन्न आणि भाडं असं दर्शवण्यात आलं आहे. त्यांच्यावर चार गुन्हे दाखल असून तीन खटले प्रलंबित असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. उदयनराजेंच्याकडं मर्सिडिज बेन्ज, ऑडी, इन्डिवर, मारुती जिप्सी अशा अलिशान गाड्या असून त्यांची किमंत 91 लाख 70 हजार आहे.
शाहू छत्रपतींची जंगम मालमत्ता : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रात छत्रपती यांच्या नावे स्थावर आणि जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं आहे. तर, पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखाची संपत्ती आहे. विशेष म्हणजे छत्रपती यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. राजघराण्यातील शाहू छत्रपती यांची असणारी संपत्ती पाहता त्यांच्याकडं व्हींटेज कारसह सगळ्या गाड्यांची किंमत 6 कोटी इतकी आहे. शाहू छत्रपतींच्या नावावर असलेल्या गाड्यांची किंमत सहा कोटी 19 लाख 46 हजार इतकी आहे. शाहू छत्रपतींची 147 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे 17 कोटी 35 लाख तसंच 23 कोटी 71 लाखांची जंगम मालमत्ता आहे.
दागदागिने किती कोटींचे आहेत? : शाहू महाराजांना दागिन्यांचा शौक नसला, तरी एक कोटी 56 लाखांचं सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने त्यांच्याकडं आहेत. पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे तीन कोटी 76 लाख 45 हजारांचे सोन्याचे तसंच हिऱ्याचे दागिने आहेत तर, चांदीचे दागिने 17 लाख 03 हजाराचे आहेत.
गुंतवणूक ३० कोटींची : शाहू छत्रपती यांनी विविध बँका, वित्तीय कंपन्या यामधून 29 कोटी 74 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. शाहू छत्रपती यांनी विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 108 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर याज्ञसेनीराजे यांनी पाच कोटी 29 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
छत्रपतींकडे व्हिंटेज कारसह इतर गाड्या कोणत्या आहेत? : शाहू छत्रपती त्यांच्याकडं मेबॅक या व्हिटेज कारसह मर्सिडिज बेंझच्या तीन कार, एक इनोव्हा तसंच महिंद्रा थार आहे.
वार्षिक उत्पन्न किती? : शाहु महाराज यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षात वार्षिक उत्पन्न दोन कोटी 08 लाख असल्याचं दाखविलं आहे.
शेतजमीन 123 कोटींची : शाहू छत्रपतींच्या नावे 122 कोटी 88 लाख 59 हजार इतक्या किमतीची शेतजमीन आहे. पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी 52 लाख 88 हजार रुपयांची शेतजमीन आहे. त्यांच्या नावावर राधानगरी येथील फेजिवडे येथील घर तसंच न्यू पॅलेसची इमारत आहे.
हे वाचलंत का :
- डॉ. आंबेडकरांसारख्या दिग्गजांचा झाला होता पराभव, काय आहे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचं गणित? - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणूक : राजकीय पक्षांना सोशल मीडियाचे वेध, रस्त्यांवरील प्रचारांपेक्षा सोशल मीडियावर अधिक भर - Lok Sabha Election 2024
- "10 वर्षांत केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं...", शरद पवारांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024