छत्रपती संभाजीनगर Ganeshotsav 2024 : सार्वजनिक गणेश मंडळात बाप्पाची सर्वात मोठी मूर्ती बसवण्याची जणू स्पर्धा सगळीकडं लागली आहे. मात्र, त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणींकडं कोणाचं लक्ष जात नाही. आता सर्वात मोठा नाही तर सर्वात छोटा गणपती शहरात बसवण्यात आलाय. पर्यावरण जपण्यासाठी, कणाकणात आणि मनामनात देव ही संकल्पना समोर ठेवत 8 मिमी तांदळावर 6 मिमी आकाराचा हा बाप्पा साकारण्यात आलाय. त्याचं दर्शन दुर्बिणीच्या माध्यमातून घ्यावं लागतं. या बाप्पाची नोंद 'इंडिया बुक रेकॉर्ड'मध्ये करण्यात (India Book Record) आली आहे. तर 'सर्वात लहान सार्वजनिक गणेश' म्हणून बहुमान देण्यात आलाय. तसं प्रमाणपत्र देखील या मंडळाला देण्यात आलं आहे.
सर्वात लहान बाप्पाची स्थापना : हडको परिसरातील कालभैरव प्रतिष्ठानतर्फे यंदा जगातली सर्वात छोट्या बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. 8 मिमी तांदळाच्या दाण्यावर 6 मिमी जाडी आणि दीड मिमी एवढी रुंदी असलेली जगातील सर्वात लहान मूर्ती साकारण्यात आलीय. शहरातील कलाकार गजेंद्र वाढोनकर यांनी हा बाप्पा तयार केला आहे. सध्या सर्वत्र सार्वजनिक गणेश मंडळात सर्वात मोठी मूर्ती बसवण्याकडं कल आहे. मात्र त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी कोणीही लक्षात घेत नाहीत. त्यामुळं मंडळाच्या सदस्यांनी एक महिना आधी झालेल्या बैठकीत चर्चा केली. त्यात मंडळाचे सल्लागार गणेश भालेराव यांनी सर्वात लहान बाप्पाची संकल्पना मांडली आणि सर्वांनी त्याला होकार दिला. त्यातूनच तांदळाच्या दाण्यावर बाप्पा साकारून त्याची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळात स्थापित होणार सर्वात लहान बाप्पा म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
गजेंद्र वाढोनकर यांनी साकारला बाप्पा : शहरात राहणारे प्रसिद्ध कलाकार गजेंद्र वाढोनकर यांनी सर्वात लहान बाप्पा साकारला. त्यांनी आतापर्यंत तांदूळ, ज्वारी, तीळ सारख्या धान्यांच्या दाण्यावर वेगवेगळी चित्रं रेखाटली असून, वेगवेगळ्या पद्धतीचे दहा विक्रम त्यांच्या नावावर आहेत. कालभैरव प्रतिष्ठानतर्फे संकल्पना सांगितल्यावर त्यांनी अष्टविनायक गणपतीमधील 'ओझरचा विघ्नेश्वर' तांदळाच्या दाण्यावर रेखाटला आहे. अवघ्या 2 मिनिट 44 सेकंदात हा बाप्पा साकारण्यात आला आहे. जगातील सर्वात लहान गणेश मूर्ती साकारण्याचा मान मिळाल्यानं आनंद होत असल्याचं मत, कलाकार गजेंद्र वाढोनकर यांनी सांगितलं.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश : गणेश उत्सवात पर्यावरण संवर्धन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मोठी गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करतात. त्यांचं विसर्जन करण्यासाठी शहरात व्यवस्था नसते. त्यामुळं जवळच असलेल्या नदीत किंवा तलावात विसर्जन करावं लागतं. त्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याच्या हेतूनं ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. गणेशोत्सव झाल्यावर छोट्या बाप्पाची प्रत्येक चतुर्थीला मंडळातील सदस्यांच्या घरी विधिवत पूजा करण्यात येणार आसल्याची माहिती, उपाध्यक्ष आदित्य कुलकर्णी यांनी दिली.
हेही वाचा -