छत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यातील लेंभेवाडी फाट्याजवळ धुळ -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरील पती आणि पत्नी जागीच ठार झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही कार छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात असताना भरधाव वेगात असल्यानं कार चालकांचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर ही कार दूभाजकाला धडकली. त्याचवेळी दुसऱ्या दिशेनं जाणाऱ्या स्कुटीला उडवून त्यावर ती कार नाल्यात पलटी झाली. या अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीची सोशल मीडियावर असलेली रिल्स चर्चेत आली आहे.
कसा घडला अपघात ? : सतिश शाहू मगरे आणि तेजल सतिश मगरे अशी मृतांची नावे आहेत. ते अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील रहिवाशी होते. सतिश आणि तेजल दोघे पती-पत्नी छत्रपती संभाजीनगरला जात असताना लेंभेवाडी फाट्याजवळ अपघात घडला. या घटनेमुळं मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सतीश मगरे आणि त्यांच्या पत्नी तेजल या अंबड येथे साखरपुड्यासाठी कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर ते छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना रविवारी रात्री हा अपघात घडला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री या भागात हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटलं. गाडी दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात गाडी दाम्पत्याला घेऊन नालीत जाऊन पडली. कारखाली दबून मगरे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर कारचालक घटनास्थळीच वाहन सोडून फरार झाला.
मृत्यू आधी बनवला व्हिडिओ : अपघातानंतर त्यांना पाचोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. सतीश मगरे आणि त्यांच्या पत्नी तेजल मगरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांमध्ये एकच शोककळा पसरली. या घटनेच्या काही दिवस आधी दोघांनी एका गाण्यावर व्हिडिओ बनवला होता. जुन्या मराठी चित्रपटातील सोन्याचा संसार या गाण्यावर त्यांनी हा व्हिडिओ बनवलाय. या अपघातानंतर हा व्हिडिओ पाहून मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले. सुखी संसाराचं स्वप्न बघत त्यांनी हा व्हिडिओ तयार केला होता. मात्र हा व्हिडिओ बघून आता कुटुंबीयांना दुःख होत आहे. सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या या दाम्पत्याचं अपघाती निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर अंबड पोलिसांनी वाहन चालकाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा
- पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारनं उडवलं, एकाचा मृत्यू - Pune Hit and Run Case
- वरळीत 'हिट अँड रन'चा थरार; नेत्याच्या BMW नं उडवल्यानं महिलेचा मृत्यू, दोघांना अटक - Worli Hit And Run Accident
- 'वरळी हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची आदित्य ठाकरेंची मागणी; मुख्यमंत्री म्हणाले, "शिवसेनेचा कार्यकर्ता असला..." - Worli Hit And Run Accident