नागपूर : जागतिक कीर्तीचे प्रसिध्द व ख्यातनाम विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांनी आजपासून सलग 24 तास डोसे तयार करण्यास सुरुवात केली आहे. ते उद्या (सोमवारी) सकाळी 10 वाजेपर्यंत डोसे तयार करणार आहेत. प्रत्येक तासाला 150 डोसे तयार करण्याचं उद्धिष्ट ठेवण्यात आलं आहे. अयोध्येत 7 हजार किलोचा 'राम हलवा' सर्वात मोठा व्हेज कबाब, सर्वात मोठा पराठा, सर्वात मोठी पुरणपोळी 52 तासांची नॉन-स्टॉप कुकिंग मॅरेथॉन आणि यासह 25 विश्वविक्रम त्यांनी आपल्या नावे केले आहेत.
24 तास डोसा बनविण्याचा विश्वविक्रम : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर आणखी दोन विश्वविक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ते विश्वविक्रम करणार आहेत. आज सकाळी 8 वाजता त्यांनी डोसे तयार करण्यास सुरुवात केली असून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे.
विश्वविक्रमी डोस्यासाठी लागणारे साहित्य : 100 किलो उडद दाळ (खास कर्नाटकातली घोडा नंबर 1 दर्जाची), 300 किलो तांदूळ (खास दोस्याचे तांदूळ), 35 किलो मेथी दाणे, 50 किलो– पोहे, 200 किलो शेंगदाणा तेल, 200 किलो खोबरं, 100 लिटर दही, 100 किलो डाळवं, 50 किलो लाल मिर्ची, 5 किलो हिंग, 5 किलो मोहरी, 50 किलो मिठ, 25 किलो कोथिंबिर, 50 किलो साखर, 50 किलो कढीपत्ता वापरला जाणारा आहे.
6 हजार डोसे तयार करणार : शेफ विष्णूमनोहर यांनी यापूर्वी अनेक रेकॉर्ड केले आहेत. त्यांच्या नवीन रेकॉर्डसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विष्णूजी की रसोई परिसर येथं खुलं रंग मंच तयार करण्यात आलं असून ते 1 तासात 150 डोसे तयार करीत असून पुढचे 24 तास म्हणजे सोमवारपर्यंत साधारणपणे 5 ते 6 हजार डोसो तयार केले जाणार आहेत.
दोन विश्वविक्रम होणार : विष्णू मनोहर आणखी दोन विश्वविक्रमावर नाव कोरणार आहेत. संपूर्ण उपक्रमात दोन विश्वविक्रम नोंदवले जातील. पहिला विश्वविक्रम 'न थांबता 24 तास डोसे बनविणं' हा राहील तर दुसरा विश्वविक्रम '24 तासात जास्तीत जास्त डोसे बनविणे' असा असेल. विष्णू मनोहर यांनी तयार केलेले डोसे खायला वेगवेगळया संस्थांना आमंत्रित केलं आहे. त्यात अंधविद्यालय, स्पेशल मुलांच्या शाळा, तृतीयपंथियांचा संघ, अनाथाश्रम, मुकबधीर विद्यालय, वृद्धाश्रम यांचा समावेश आहे. याशिवाय इतर मंडळीदेखील डोस्याचा आस्वाद घेत आहेत.
हेही वाचा